Monday, September 14, 2026
ENTERTAINMENTLatest News

जय जय स्वामी समर्थ मालिकेत उर्मिलाची ‘अग्नीपरीक्षा’, स्वामींच्या कृपेने मिळाली नवसंजीवनी!

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका आजवर अनेक आध्यात्मिक आणि भावनिक क्षणांनी सजली आहे, पण नुकत्याच प्रसारित झालेल्या एका महत्त्वाच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनी अनुभवला निखळ भक्ती, आध्यात्मिक विस्मय आणि भावनांचा गुंता. उर्मिलाची ‘अग्नीपरीक्षा’ ही केवळ कथानकातील घटना नव्हे, तर तिच्या श्रद्धेचा, निष्ठेचा आणि धैर्याचा अग्नितून गेलेला निर्णायक क्षण ठरतो.

गावकरी, रावसाहेब, अंबरीश, अनुसूया आणि इतर सगळे स्वामींच्या समोर उभे असताना उर्मिलाला अग्नीप्रवेशाची तयारी असल्याचं ती स्पष्ट करते. तिचा आवाज ठाम, चेहरा शांत आणि मनोबल अटळ — “माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे… जे काही ते सांगतील, तेच माझं अंतिम सत्य.” तिचा हा निर्णय सगळ्यांना हादरवून टाकतो. कपिला आणि बाळप्पाही चकित होतात. बाळप्पा म्हणतो, “गुरुच्या अर्ध्या वचनात आहे म्हणणं आणि प्रत्यक्षात ती तयारी असणं वेगळं… मी उर्मिलाला नमन करतोय.”

तेवढ्यात अग्नीकुंड धगधगू लागतं… उर्मिला हात जोडून त्यात प्रवेश करते. अंबरीश, अनुसूया, रावसाहेब यांचा टाहो फुटतो — “उर्मिला…” सगळ्यांच्या डोळ्यांसमोर जणू तिचं भस्मसात होणं घडतं. पण… अचानक आकाशातून घुमतो तारक मंत्र. ज्वाळा शांत होतात आणि त्यात उभी असते उर्मिला — तिच्या मागे स्वामींचा तेजस्वी रूप! “जिसकी नीयत सच्ची, जो हमारा बच्चा, उसे आग का डर कैसा?” या स्वामींच्या शब्दांनी सर्वजण भारावून जातात. उर्मिलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आनंदाचे, विश्वासाचे, कृपेसिद्धतेचे.

उर्मिलाचं पात्र आता केवळ श्रद्धेचं नव्हे, तर संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरतं. स्वामींच्या कृपेवर असलेला विश्वास हा चमत्कारी ठरतो अग्नीही तिचं काहीही वाकडं करू शकत नाही. या थरारक क्षणांनी सजलेला जय जय स्वामी समर्थ मालिकेचा एपिसोड प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालतोय. मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता कोणता नवसंकेत येणार? उर्मिलाच्या या तपस्विनी रुपामागे दडलेली नवी कथा काय उलगडणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading