एमसीसीच्या वतीने रंगसेतू अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करण्याचे कलाकारांना आवाहन
नाट्य, संगीत, नृत्य व दृश्यकला क्षेत्रांत काम करू इच्छिणाऱ्या कलाकारांना १५ मे पर्यंत करता येणार अर्ज
पुणे : नाट्य- संगीत- नृत्य व दृश्यकला क्षेत्रांत काम करू इच्छिणाऱ्या तरुण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या रंगसेतू अभ्यासवृत्ती (फेलोशिप)साठी अर्ज करण्याचे आवाहन सेंटरच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती रंगसेतू अभ्यासवृत्तीचे समन्वयक प्रमोद काळे यांनी कळविली आहे. येत्या १५ मे पर्यंत सदर अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याचेही त्यांनी सांगितले.
रंगसेतू अभ्यासवृत्तीविषयी अधिक माहिती देताना प्रमोद काळे म्हणाले, “महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही प्रयोगकलांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली, पुण्यातील एक अग्रगण्य व मान्यवर संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेने ‘रंगसेतू अभ्यासवृत्ती’ हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला असून सदर वर्ष हे या अभ्यासवृत्तीचे सातवे वर्ष आहे. नाट्य, दृश्यकला, संगीत व नृत्य या कलाक्षेत्रांत व्यावसायिक म्हणून जम बसवू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण कलाकारांसाठी सेंटरच्या वतीने प्रत्येक महिन्याला रुपये १२ हजार (वार्षिक एक लाख ४४ हजार रुपये) ही एका वर्षासाठीची विशेष अभ्यासवृत्ती देण्यात येते. याद्वारे नवोदित आश्वासक कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा उद्देश आहे.”
नाट्य (लेखन, दिग्दर्शन, अभिनय), दृश्यकला (चित्र, शिल्प, इंस्टॉलेशन व अन्य), संगीत (गायन, वादन, संगीत रचना), नृत्य (सर्व भारतीय अभिजात नृत्यशैली, आधुनिक व प्रायोगिक नृत्य प्रकार) या प्रकारांत कार्यरत असलेल्या, महाराष्ट्रातील उदयोन्मुख कलाकारांना या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करता येतील याची कृपया नोंद घ्यावी.
या अभ्यासवृत्ती अंतर्गत सेंटर संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागवून, त्यांचे परीक्षण करून प्रत्येक कलाक्षेत्रातील काही व्यक्तींची निवड करते. निवड झालेल्या कलाकारांसाठी पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी आपला प्रकल्प कशा पद्धतीने सादर करायचा, त्याबद्दलची अधिक माहिती देत कलाकारांना तयार करण्यात येते. कलाकारांकडून तयारी करून घेतल्यानंतर सेंटरच्या वतीने याच दरम्यान त्यांच्या मुलाखतींचे आयोजन केल्या जाते. यावेळी चार तज्ज्ञ समन्वयक दोन दिवसांच्या कार्यशाळेसह मुलाखती घेऊन प्रत्येक कलाक्षेत्रातील एक, अशा एकूण चार कलाकारांची अंतिम निवड ‘रंगसेतू’ अभ्यासवृत्तीसाठी करतात. यामध्ये नाट्य, दृश्यकला, संगीत आणि नृत्य या चार अभ्यासवृत्तींसोबतच दृश्य कलेत काम करणाऱ्या एका प्रकल्पाला अजित गाडगीळ यांच्या वतीने एक अभ्यासवृत्ती तर दोन तुल्यबळ व सारख्या प्रकल्पांच्या अर्जदारांपैकी एकाला प्रमोद काळे यांच्या वतीने एक अशा किमान ५ तर कमाल ६ अभ्यासवृत्त्या सेंटरच्या वतीने दिल्या जातात असेही प्रमोद काळे यांनी सांगितले. निवड प्रक्रियेमध्ये असलेल्या समितीमध्ये डॉ. चैतन्य कुंटे (संगीत), डॉ. नितीन हडप (दृश्यकला), डॉ. अजय जोशी (नाट्य) आणि डॉ. मीता पाठक (नृत्य) या मान्यवरांचा सहभाग आहे.
निवडलेल्या अभ्यासवृत्ती उमेदवाराला दरमहा १२,०००/- रुपये (एकूण एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये) दिले जातील. प्रत्येक पुरस्कार विजेत्याला त्याच्या/तिच्या सर्जनशील कार्याचा त्रैमासिक अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. तज्ज्ञांच्या समितीने अहवालाचे मूल्यांकन केल्यानंतरच, फेलोशिपचा पुढील हप्ता दिला जातो. म्हणून, एकूण रक्कम चार हप्त्यांमध्ये दिली जाईल. फेलोशिपच्या शेवटी, प्रत्येक अभ्यासवृत्ती विजेत्याला महाराष्ट्र कल्चरल सेंटर येथे एक सादरीकरण किंवा प्रदर्शन देणे बंधनकारक आहे
सदर अभ्यासवृत्तीसाठी अर्जदार हा २२ ते ३५ या वयोगटातील असावा. त्याच्याकडे स्वत:च्या कलाक्षेत्रातील औपचारिक वा अनौपचारिक शिक्षण/ पदवी असावी. त्याचा जन्म वा शिक्षण महाराष्ट्रात झालेले असावे अथवा गेली किमान ७ वर्षे महाराष्ट्रात त्याचे वास्तव्य असावे. त्याला आपल्या क्षेत्रातील किमान ७ वर्षांचा अनुभव असावा, तसेच हा कलाकार स्वत:च्या कलाक्षेत्रात सध्या कार्यरत असणे आवश्यक आहे. हा कलाकार कोणत्याही स्वरूपाची पूर्ण वेळ नोकरी किंवा अन्य व्यवसाय करणारा नसावा ही या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करण्यांसाठी असलेले निकष आहेत. संपूर्ण राज्यातून दरवर्षी या अभ्यासवृत्तीसाठी २०० ते २५० अर्ज सेंटरकडे येत असून आजवर सेंटरच्या वतीने किमान ३० कलाकारांना आजवर ही अभ्यासवृत्ती मिळाली असल्याची माहितीही यावेळी काळे यांनी दिली.
या अभ्यासवृत्ती संदर्भातील अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही १५ मे, २०२५ असून, ७ व ८ जून रोजी पुण्यात या संदर्भातील कार्यशाळा व मुलाखती संपन्न होतील. यानंतर २९ जून रोजी एका औपचारिक कार्यक्रमात या अभ्यासवृत्ती मिळालेल्या कलाकारांच्या नावांची घोषणा होईल.
छापील अर्जासह ऑनलाईन अर्ज ईमेलवरून पुढील पत्त्यावर पाठवावा –
नाट्य – https://forms.gle/
संगीत – https://forms.gle/
नृत्य – https://forms.gle/
या विषयक अधिक माहितीसाठी rangasetu@mcckala.com या मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे. अर्जासह आपले छायाचित्र, तसेच आपल्या कलाक्षेत्रात आधीच्या केलेल्या कामाचे नमुने (लेखन/ फोटो/ व्हिडीओ/ ऑडीओ/ यूट्युब लिंक्स) जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रमोद काळे यांना ९८५०८३९९१७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
