Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

प्राचीन साहित्यात तर्कनिष्ठ विचार, मात्र त्याबद्दल हिंदू समाज अनभिज्ञ

अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. अजित दामले यांची भावना

पुणे  : आपले प्राचीन साहित्य वाचले की त्या काळात इतका तर्कनिष्ठ विचार करणारा जनसमुदाय अस्तित्वात होता याचे आश्चर्य आणि अभिमान वाटत राहतो. परंतु आज त्याविषयी जनमानसात फारशी माहिती नसल्याने नागरिक किती अनभिज्ञ आहेत ही सलही मनाला टोचत राहते, अशा भावना अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. अजित दामले यांनी व्यक्त केल्या. माझ्या हिंदू धर्मावर लिहिलेल्या पुस्तकामागील खरी प्रेरणा हीच असून त्यायोगे अनभिज्ञ असणाऱ्या समाजाला प्राचीन साहित्यात तर्कनिष्ठ विचारांची माहिती व्हावी हा उद्देश असल्याचेही त्यांनी संगितले.

गेल्या ३० वर्षांपासून अमेरिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. अजित दामले यांनी लिहिलेल्या ‘हिंदू धर्म’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात संपन्न झाले. प्राचार्य मुकुंद कोंढवेकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भांडारकर संस्थचे डॉ. श्रीकांत बहुलकर, विलास जावडेकर, अॅड आनंद आकूत यावेळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

प्राचीन साहित्य कोणत्या दर्जाचे होते, हे त्याचा खोलात जाऊन अभ्यास केल्यास उमगत जाते. कोणत्याही भ्रामक कल्पनेतून ते लिहिले गेलेले नाही, याची प्रचिती आपल्याला याच अभ्यासातून येते असे सांगत डॉ दामले म्हणाले, “३० वर्षांपासून मी अमेरिकेत हृदयशल्यविशारद म्हणून काम करत होतो. पण, काही काळापूर्वी मानेचे दुखणे सुरु झाले आणि त्यामुळे माझे सगळेच काम थांबले. या आजारपणातून बाहेर पडण्यासाठी मानेवर दोनवेळा शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर हळूहळू त्यामधून बाहेर आलो. हृदयशल्यविशारद म्हणून काम करताना आयुष्य खूपच व्यस्त असायचे, पण या आजारपणामुळे त्यामध्ये बदल झाला होता. आजारामधून बाहेर वाचनामध्ये मन रमवले, तेव्हा प्राचीन साहित्याशी संपर्क आला.”

नासदीय सूक्त, वेद, उपनिषद यांचे वाचन याच काळात सुरु असताना ते समजून घेण्यास चार ते सहा महिने गेले. आपण स्वतः हिंदू आहोत, त्यामुळे हे प्राचीन साहित्य समजावून घेण्याच्या प्रयत्न करू या धारणेतून एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार केले. याच्या सुमारे अकराशे स्लाईडस् झाल्या. त्यामधून हे पुस्तक साकारले गेल्याचे डॉ. दामले यावेळी म्हणाले.

हिंदू धर्म प्राचीन आणि सर्वदूर पसरलेला आहे, त्याची प्रगती कशी झाली याचा अभ्यास या काळात करता आला. सध्याचा हिंदुधर्म हा भक्तीप्रधान असून ही परंपरा दक्षिणेकडून आली असल्याचे भाष्य डॉ. दामले यांनी यावेळी केले. हे पुस्तक लिहिताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या लिखाणाची व भाषणांची खूप मदत झाल्याचे देखील दामले यांनी नमूद केले.

डॉ. दामले यांच्या ‘हिंदू धर्म’ या पुस्तकामध्ये वीस टक्क्याहून अधिक भाष्य हे भगवद्गीतेवर करण्यात आले आहे. भगवद्गीता ही प्रत्येक व्यक्तीमधील मनुष्यत्वाचा भाव जागे करण्याचे काम करते, असे प्राचार्य कोंढवेकर म्हणाले.

माणूस सध्या तुलना आणि अपेक्षा यांमध्ये अधिक प्रमाणात गुंतला आहे, हे कुठेतरी थांबायला हवे. आपल्यामध्ये असणाऱ्या त्रुटी समजून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला तरच आपण निश्चितपणे पुढे जाऊ शकू असे, मत देखील यावेळी प्राचार्य कोंढवेकर यांनी व्यक्त केले.

आपल्याकडे मोठ्या प्रमाणात माहितीचा खजिना उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचे रूपांतर योग्यवेळी ज्ञानात आणि त्यानंतर बोधात झाले तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, असे डॉ. संप्रसाद विनोद यावेळी म्हणाले.

भारताच्या बाहेर असणाऱ्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने देशाची महती लक्षात येते. डॉ. अजित यांना देखील त्यामधूनच हे पुस्तक लिहिण्याचे सुचले. सर्वसमावेशक असणाऱ्या हिंदू धर्माची विश्वव्यापकता मोठी आहे असे डॉ. विनोद यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. आनंद आकूत यांनी केले. विलास जावडेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading