नवा शुक्रताराचे शंभरीत पदार्पण
येत्या ७ एप्रिल रोजी संपन्न होणार नवा शुक्रताराचा १०० वा प्रयोग
पुणे : स्व. अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांचा ‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम शंभरीत पदार्पण करत असून सादर कार्यक्रमाचा १०० वा प्रयोग येत्या सोमवार दि. ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५:३० वाजता, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न होईल. अतुल अरुण दाते व मॅजेस्टिक लँडमार्क्स यांच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका शनीवार, दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रसिकांसाठी उपलब्ध असतील अशी माहिती अतुल अरुण दाते यांनी कळवली आहे.
‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, पल्लवी पारगांवकर व वर्षा जोशी हे प्रमुख गायक कलाकार सहभागी होणार असून स्व. अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते हे वडिलांच्या विविध आठवणींना दृकश्राव्य माध्यम व संवादातून उजाळा देणार आहेत.
मंदार आपटे हे प्रसिद्ध गायक व संगीतकार आहेत. ‘ती सध्या काय करते’ या लोकप्रिय चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन आपटे यांनी केले आहे. तर पल्लवी पारगांवकर या वकील व प्रसिध्द गायिका असून वर्षा जोशी या जागतिक भावगीत स्पर्धेच्या विजेत्या आहेत. नवा शुक्रतारा कार्यक्रमाची संकल्पना अतुल अरुण दाते यांची असून ते स्वतः सूत्रसंचालनाची जवाबदारी देखील पार पाडतील.
