Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

एआय तंत्रज्ञानाच्या वापराने स्पायरल डिझाईनचे अत्याधुनिक कृत्रिम भिंगारोपण करीत पुण्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

पुण्यातील डॉ. विमल परमार ठरले आशिया खंडातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले नेत्रतज्ज्ञ

पुणे  : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाच्या वापराने स्पायरल डिझाईन (रेनर गॅलेक्सी टोरिक स्पायरल)चे अत्याधुनिक कृत्रिम भिंगारोपण (इंट्रा ऑक्युलर लेन्स) व मायक्रोइंसिजन कॅटरॅक्ट सर्जरी (एमआयसीएस) अर्थात मोती बिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडणारे पुण्यातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विमल परमार हे आशिया खंडातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले नेत्रतज्ज्ञ ठरले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध सराफ फत्तेचंद रांका यांच्यावर ही शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.

यासंदर्भातील पार्श्वभूमी सांगताना महावीर सुपर स्पेशॅलिटी आय हॉस्पिटलचे संचालक व नेत्रतज्ज्ञ डॉ. विमल परमार म्हणाले, “मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि त्यासाठी वापरात येणारे लेन्स यामध्ये मागील काही दशकात भरपूर संशोधन होत आहे. यामध्ये मोनोफोकल, बायफोकल, ट्रायफोकल, टोरिक लेन्सेस यांचा वापर आम्ही गेले कित्येक वर्षे करीत आलो आहोत. यामध्ये अत्याधुनिक अशा ट्रायफोकल, टोरिक किंवा एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस आणि एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस टोरिक या लेन्सेसचा वापर आम्ही यशस्वीरित्या मोठ्या प्रमाणात करीत आहोत.”

या शस्त्रक्रियांमध्ये लावण्यात येणाऱ्या लेन्सेसद्वारे लांबचे, जवळचे, वाचन करताना, मोबाईल, लॅपटॉप वापरताना आवश्यक असलेल्या अंतरावरचे दिसावे यासाठी शस्त्रक्रिया होत असतात. परंतु, क्वचित काही रुग्णांमध्ये ट्रायफोकल लेन्सेसमुळे समोरून येणाऱ्या प्रकाशाचा ग्लेअर येणे, सावली अर्थात शॅडो पडणे, कमी उजेडात वाचनाचा त्रास होणे किंवा स्पष्ट न दिसणे अशा समस्या येत असल्याचे लक्षात आले असे सांगत डॉ. परमार पुढे म्हणाले की, “या समस्यांमुळे काही रुग्णांचे ‘क्वालिटी ऑफ व्हिजन’ आणि ‘क्वालिटी ऑफ लाईफ’ यांवर फरक पडण्याची शक्यता असायची. यावर तोडगा काढण्यासाठी संशोधन होत असताना एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सचा शोध लावण्यात आला. या लेन्सेसच्या डिझाईनमुळे बायफोकल किंवा ट्रायफोकल लेन्समध्ये रुग्णांना दिसणाऱ्या रिंग्जचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी झाला. मात्र. जवळच्या दृष्टीसाठी चष्मा लावण्याची गरज पडणे हा तोटा होताच. नजीकच्या काळात रुग्णांच्या सोयीसाठी जगभरातील कंपन्या यासंदर्भात संशोधन करीत आहेत.”

या संशोधनावर आधारित, आणि तीनही अंतरावरचे दिसून रुग्णाची क्वालिटी ऑफ व्हिजन व क्वालिटी ऑफ लाईफ सुधारू शकेल यावर भर देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ब्रिटनच्या एका कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय तंत्रज्ञान) वापर करीत काही महिन्यांपूर्वी स्पायरल डिझाईनची लेन्स आणली. त्यांच्या संशोधनाप्रमाणे आणि ब्रिटन व ऑस्ट्रेलियाच्या डॉक्टरांच्या अनुभवाप्रमाणे या लेन्समध्ये ग्लेअर किंवा हॅलोज दिसण्याचे प्रमाण बरेच कमी झाले असून तीनही अंतरावरचे चष्मा न लावता रुग्णांना स्पष्ट दिसते. शिवाय साधारण ९० टक्के व त्यापेक्षा अधिक दृष्टी येत असल्याचे रुग्णांचे अनुभव देखील आहेत. ही लेन्स वापरून नुकतेच पुण्यात आम्ही एक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्याचे डॉ. परमार म्हणाले.

या लेन्सेस मुळे डोळ्यांच्या पडद्यापर्यंत जास्तीत जास्त प्रकाशकिरण पोहोचत असल्याचे रुग्णांनी सांगितले आणि कमीत कमी लाईट लॉस होत असल्याचे निरीक्षण देखील रुग्णांनी नोंदविल्याचे डॉ. परमार यांनी नमूद केले.

या लेन्सचा वापर काही महिन्यांपासून ब्रिटन व ऑस्ट्रेलियाच्या काही डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्या असून त्यांना सकारात्मक अनुभव आला आहे. आशिया खंडांत मात्र केवळ बंगळूरू मधील एका डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली असून पुण्यात झालेल्या या शस्त्रक्रियेमुळे डॉ. परमार हे आशिया खंडातील दुसरे तर महाराष्ट्रातील पहिले नेत्रतज्ज्ञ ठरले आहेत.

पुण्यातील फत्तेचंद रांका यांच्या डोळ्यांचा नंबर हा सिलेंड्रीकल असल्याने त्यांना रेनर गॅलेक्सी नॉन डिफ्रॅक्टिव्ह टोरिक इंट्राऑक्युलर लेन्सेस विथ स्पायरल डिझाईन बसवाव्या लागल्या. ही लेन्स मोतीबिंदू आणि सिलेंड्रीकल लेन्स असलेल्या रूग्णांसाठी फार लाभदायक ठरू शकतात, मात्र दीर्घकाळाचे रिझल्ट्स नजीकच्या भविष्यात अधिक स्पष्ट होतील असे डॉ. परमार यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading