Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९० पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल पूजन

 

पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे नाथ षष्ठी निमित्त योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९० पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल यांचे पूजन मंदिरात झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचे प.पू.माधवनाथ महाराज हे अध्यात्मिक गुरु होते. त्यामुळे याचे पूजन दरवर्षी मंदिरात करण्यात येते.

यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे यांसह ट्रस्टचे माजी अध्यक्ष शिरीष मोहिते, विश्वस्त बी.एम. गायकवाड आदी उपस्थित होते.

राजेंद्र बलकवडे म्हणाले, योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराजांची पुण्यतिथी म्हणजे समाधी दिन, हा दिवस नाथषष्ठीचा. प.पू. माधवनाथ महाराजांचा जन्म १८५७ रोजी चित्रकूट येथे झाला. त्यांची नित्य साधने म्हणजेच त्यांनी वापरलेले व्याघ्रासन व शाल रविवार पेठ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी कै.रंगनाथ नारायण होशिंग-आलेगांवकर यांना दिले.

ते पुढे म्हणाले, हे साहित्य गेली ९० वर्षे रविवार पेठेतील पुजारी कै.बाळकृष्ण आलेगांवकर, कै.विनायक आलेगांवकर यांनी जतन केले. त्यांच्या पत्नी कै. पद्मजा आलेगांवकर व मुलगी गौरी गुमास्ते, राहुल गुमास्ते, देवेश गुमास्ते यांनी हा अमुल्य ठेवा जोपासला असून दत्तमंदिरात दरवर्षी भाविकांना दर्शनासाठी आणले जाते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई यांचे माधवनाथ महाराज हे अध्यात्मिक गुरू होते. त्यांच्या प्रेरणेनेच पुण्यातील जगद््विख्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व श्रीमती लक्ष्मीबाई यांनी श्री दत्त मंदिराची स्थापना केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading