शिवजयंतीनिमित्त शिवसृष्टीमध्ये अनेक कार्यक्रम संपन्न
पुणे : पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीमध्ये नुकतीच तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे विश्वस्त अमृत पुरंदरे, प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आणि शिवसृष्टीचे अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी नृत्य दर्पण अकादमीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भरतनाट्यम नृत्यविष्कार प्रस्तुत करण्यात आला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते अफजलखान वधापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास उपस्थितांसमोर नृत्याच्या स्वरूपात उलगडला गेला. याशिवाय यावेळी सादर झालेल्या विविध कार्यक्रमांदरम्यान अधिरा विटेकर व काव्या या मुलींनी पोवाडा गायला. हर्षल पवार या मुलाने महाराजांवरील एक गाणे सर्वांसमोर गायले तर वैष्णवी बडगुजर या मुलीने शिवाजी महाराजांच्या आरतीवर नृत्य सादरीकरण केले. यावेळी अर्पिता साळुंखे हिने ‘शिवतांडव’ नृत्य प्रस्तुतीने उपस्थितांची मने जिंकली. स्वरूप अवघडे या मुलाने गरद गायली. या सर्व विद्यार्थ्यांचे शिवसृष्टीच्या वतीने कौतुक करण्यात आले.
याबरोबरच शिवजयंतीच्या आदल्या दिवशी ठाणे जनता सहकारी बँक (टीजेएसबी)च्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने शिवसृष्टीला भेट देत शिवकालीन इतिहासाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शिवसृष्टीमधील दुर्गवैभव’, ‘रणांगण’ ही दालने, महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार उभा करणारे दालन, प्रत्यक्ष शिवराय आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव देणारे ‘श्रीमंत योगी’ हे दालन, भवानीमाता मंदिर, राज्याभिषेकाचा देखावा असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हे दालन यांना भेट दिली. छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी, त्यांना असलेला स्वभाषा, स्वराज्य आणि स्वधर्माचा अभिमान, त्यांच्यावर आलेली संकटे आणि या सर्वांवर मात करून त्यांनी उभारलेले स्वराज्य या सर्वांची माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून पाहताना अंगावर शहारे आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसृष्टी पाहून झाल्यावर टीजेएसबीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीमधून मिरवणूक काढली. सरकारवाडा येथून भवानी माता मंदिरापर्यंत वाजत गाजत त्यांनी ही पालखी नेली. भवानी माता मंदिरामध्ये कार्यक्रमाचा समारोप झाला.
