Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

उद्योगांचा विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर – रवी पंडित

पुणे: आर्थिक विकासाच्या दृष्टीने भारत हा सगळ्यात वेगवान देश आहे. इतर कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था भारताइतकी वेगवान नाही. देशाच्या एकूण उद्योगधंद्यापैकी २० टक्के उद्योग हे महाराष्ट्रात चालतात. यात आणखी भर घालून उद्योगधंद्यांचा विकास करण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्रावर आहे, असे मत केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांनी व्यक्त केले.

मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन च्या वतीने कर्वेनगर मधील महालक्ष्मी लॉन्स येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यावसायिकांमध्ये उद्योजकता व कल्पकता यांचा विकास व्हावा, या उद्देशाने मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. भीमथडी च्या संस्थापक सुनंदा पवार यांना एमईए चे आयकॉन म्हणून तर एमईए प्राईड हा पुरस्कार तेजराज पाटील यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय इतरही पुरस्कारांचे वितरण यावेळी झाले.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कुराडे यांच्यासह कमिटी मेंबर अभिजित जाधव, सागर तुपे, विक्रम गायकवाड, महेश भागवत, तेजस चरवड, सई बहिरट पाटील, सायली काळे, भारती मुरकुटे, महेश घोरपडे, किशोर जगताप उपस्थित होते.
रवी पंडित म्हणाले, कोणत्याही संस्थेचे नेतृत्व जी व्यक्ती करते त्याची वाटचाल एकाकी असते. त्याचा प्रवास अवघड असतो. अशा व्यक्तींना बळ देण्याचे काम मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन सारख्या संस्था करतात. उद्योजकांनी सचोटीने आणि ग्राहकाधिष्ठित काम करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

सुनंदा पवार म्हणाल्या, एकाच वेळी अनेक कामे करण्याची ताकद महिलांमध्ये असते. त्यामुळे उद्योग करण्यासाठी महिलांनी बाहेर पडायला हवे आणि घरातल्या लोकांनी देखील त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन ही संघटना वाढवायला हवी. राजकारण आणि गट तट यापासून दूर राहिल्यावर संघटना मोठी होईल. मोकळे वातावरण हे संघटनेच्या वाढीसाठी गरजेचे आहे.

तेजराज पाटील म्हणाले, भारत देश जलदगतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे त्यात महाराष्ट्र देखील जलद गतीने पुढे जाणारे राज्य आहे. एकमेकांचे नेटवर्क उभे करत सहकार्य करून उद्योजकांनी पुढे जायला हवे.

अरुण निम्हण म्हणाले, महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा प्रकारचा एक्स्पो आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच मराठा समाजासह सर्वच समाजातील विविध संस्था व संघटनांना जोडण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. व्यावसायिकांना सहकार्य करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना देखील आखण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. नवीन व्यवसायाच्या संधी, उत्पादने व सेवांचे स्टार्टअप्स, व्यवसायवृद्धीचे नवे पर्याय, दर्जेदार उत्पादनांची खरेदी व माहिती अशी अनेक उद्दिष्टे यंदाच्या एक्स्पोमुळे साध्य झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading