Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना संगीत रत्न पुरस्कार जाहीर

पुणे : चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत क्षेत्रात गेली काही दशके उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा ‘संगीत रत्न‘ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. त्याबरोबरच प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांन देखील पुरस्कार देवून त्यांनी चित्रपटेतर संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी संगीताचा समृद्ध वारसा साजरा करण्याच्या उद्देशाने संगीतकार अजय नाईक यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र कलामंच व जस्ट कोलॅब यांच्या वतीने मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात येईल.

सदर पुरस्कार प्रदान समारंभ रविवार दि. ९ मार्च रोजी सायं ४.३० वाजता गणेश नगर, एरंडवणे येथील कर्नाटक शाळेच्या शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्काराने तर रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि पं. संजीव अभ्यंकर यांना शास्त्रीय संगीत विभागात सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अजय नाईक यांनी दिली.

पुरस्कार सोहळ्याच्या संकल्पनेबद्दल अधिक माहिती देताना नाईक पुढे म्हणाले, “महाराष्ट्राला कित्येक शतकांची थोर संगीत परंपरा आहे. यामध्ये चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत आणि स्वतंत्र (इंडी) कलाकारांनी सादर केलेली गाणी हे महत्त्वाचा भाग आहेत. गेल्या काही दशकात या संगीताला अपेक्षित असे प्रोत्साहन आणि मुख्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये स्थान मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर संगीत परंपरेतील या नवनवीन प्रयोगांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आम्ही मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् अर्थात मिमा या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्याचे ठरविले. सदर वर्ष हे या सोहळ्याचे पहिले वर्ष असून यावर्षी चित्रपटेतर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा ‘संगीतरत्न’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येईल. राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री असलेले आशिष शेलार आणि विधान परिषद सदस्य प्रसाद लाड हे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.”

याबरोबरच प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ विभागातील पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याशिवाय पहिले आयकॉनिक मराठी इंडी सॉंग म्हणून ‘गारवा’ या गाण्यासाठी कवी सौमित्र आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांचा तर पहिला आयकॉनिक इंडी मराठी शो म्हणून ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमासाठी संगीतकार-गायक जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप खरे व सलील कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नाईक यांनी कळविली आहे. या पुरस्कार सोहळ्यात सांगली जिल्ह्यातील विटा येथील गायक असलेल्या अर्जुन वाघमोडे यांना दिव्यांग विभागातील पुरस्काराने गौरविले जाईल असेही नाईक यांनी सांगितले. पुरस्कार सोहळ्यासाठी देशभरातून तब्बल ५०० हून अधिक नामांकने प्राप्त झाली होती.

महाराष्ट्रात जशा मराठी भाषेच्या अनेक उपजाती आहेत, तसेच संगीताच्या बाबतीतही प्रचंड विविधता आहे हे लक्षात घेत खानदेशी, अहिराणी, आगरी, कोळी, कोकणी, मालवणी या सर्व भाषांतील गाण्यांसोबतच मराठी मधील ‘पॉप’ संगीत भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा अनेक शैलींमध्ये गाण्यांना देखील विविध विभागांमध्ये मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् (मिमा) सोहळ्यामध्ये गौरविण्यात येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading