Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान रंगणार ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’

पुणे : सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावे या संकल्पनेतून ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ आयोजित करण्यात आले आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दिर्घ साहित्य संमेलन असणार आहे.

साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलनात‌’ सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सरहद, पुणेचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, महाराष्ट्र साहित्य परिदषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, शरद तांदळे, वैभव वाघ, शरद गोरे उपस्थित होते.

दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे दि. 19 रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून दि. 20 रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे.

‘मराठी साहित्ययात्री संमेलनात‌’ महाराष्ट्रातील विविध गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने समावेश असणार आहे. मोठ्या प्रमाणावर तरुणाईच्या सहभागामुळे हे संमेलन तरुणाईचे संमेलन ठरणार आहे. महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव असलेल्या या विशेष रेल्वेला 16 बोगी असणार असून प्रवासारदम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलन‌’ भरविण्यात येत आहे.

दि. 19 रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली जाणार आहे. ‌‘गर्जा महाराष्ट्र माझा‌’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १२०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून पुस्तक -जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. रेल्वे दि. 20 रोजी दिल्लीत पोहोचणार असून दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदानाच्या गायनाने ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलना‌’ची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. या वेळी दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून दि. 25 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या अनोख्या संमेलनाची सांगता होईल.

या अभिनव उपक्रमाची संकल्पना सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार यांची आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली असून राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. तेही रेल्वेद्वारे प्रवास करणार असून साहित्यिक, कलावंतांशी संवाद साधणार आहेत. रावण आंत्रप्रिन्युअर या पुस्तकांचे लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष तर वंदेमातरम्‌‍ संघटनेचे अध्यक्ष व व्हायरल माणुसकी या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे, (कार्यवाह), ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading