Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

११ व्या गानसरस्वती महोत्सवाची सांगता

 

​पुणे :  कथक नृत्यांगनांचा डौलदार पदन्यास, भावपूर्ण अभिनय आणि लयीचे विभिन्न आविष्कार, यांतून रविवारी खरोखरच ‘परंपरेची पदचिन्हे’ प्रकटली. या नृत्याविष्काराला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. किशोरीताईंचे पट्टशिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांच्या सिद्धहस्त ‘मालकंस’ च्या गायनाने गानसरस्वती महोत्सवाचा कळसाध्याय गाठला.

नाट्यसंपदा प्रतिष्ठान आयोजित अकराव्या ‘गानसरस्वती महोत्सवा’च्या अखेरच्या सत्रात ज्येष्ठ कथक नृत्यांगना, नृत्यगुरू आणि संरचनाकार शमा भाटे यांच्या शिष्यांनी ​’परंपरा के पदचिन्ह’ या शीर्षकांतर्गत कथक नृत्यप्रस्तुती केली. शमा भाटे यांच्या नादरूप संस्थेच्या अमीरा पाटणकर, अवनी गद्रे, श्रेया कुलकर्णी, प्रमोद वाघ आणि नयन कोहळे या विद्यार्थ्यांनी हे अप्रतिम सादरीकरण केले.

शिववंदनेने सुरू झालेल्या या नृत्याविष्कारात पुढे झपताल प्रस्तुती, ‘री मोरी मुरकी कलाई’ ही बंदिश की ठुमरी (चंद्रकंस राग), बसंत तराणा, अनाघात टुकडे अशा अनेक रचना सादर झाल्या.

चारुदत्त फडके (तबला), पार्थ भूमकर (पखवाज), शुभम खंडाळकर (गायन), यशवंत थिटे (हार्मोनियम), धवल जोशी (बासरी)‌ आणि केतकी शहा (पढंत) यांनी पूरक साथसंगत केली.

ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे सुपुत्र आणि ख्यातनाम गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने ११ व्या गानसरस्वती महोत्सवाचा परंपरेनुसार समारोप झाला. पं. रघुनंदन यांनी ‘मालकंस’ रागातील ‘तुमबिन कौन सवारे’ (विलंबित एकताल) ही बंदिश सविस्तर मांडली. रागाचे अनेकविध कंगोरे स्वराकृतींनी नटवत रघुनंदन यांनी मालकंसाचे विराट रूप रसिकांसमोर उलगडले.​ त्याला जोडून ‘मन सुमिरन कर तू रामनाम’ ही त्रितालातील बंदिश त्यांनी सादर केली.

त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) यांनी अनुरूप साथसंगत केली. पं. रघुनंदन पणशीकर यांचे अनेक शिष्यही तानपुरा व स्वरसाथीसाठी होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading