Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

पंचमदा यांचे संगीत भावविभोर करणारे ; सुरेश वाडकर

पुणे :  “प्रचंड वैविध्य, नादांचे अनोखेपण आणि उत्तम दर्जा ही पंचमदा उर्फे आर. डी. बर्मन यांच्या संगीताची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे संगीत भावविभोर करणारे आहे”, असे प्रतिपादन ज्येष्ठ पार्श्वगायक, पद्मश्री सुरेश वाडकर यांनी केले.

सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन (पंचमदा) यांचे चाहते असलेल्या पुण्यातील कलावंतांच्या एका समूहातर्फे दरवर्षी बर्मन यांच्याशी संबंधित कलाकाराचा ‘पंचमरत्न’ पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार वाडकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. आर. डी. बर्मन यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या ‘री-डिस्कव्हरींग पंचम’ या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार वाडकर यांना प्रदान करण्यात आला. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल आणि श्रीफळ असे ‘पंचमरत्न’ या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी हा पुरस्कार कर्सी लॉर्ड, मनोहरी सिंघ (मनोहरीदा), शैलेंद्र सिंग, तौफिक कुरेशी, नितीन शंकर अशा पंचमदां सोबत काम केलेल्या अनेक कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे.

वाडकर म्हणाले, “पंचमदा हे सर्वार्थाने अवलिया संगीतकार होते. वैविध्य हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मी त्यांच्याकडे बरोबर काम करण्याचा अनुभव मला समृद्ध करणारा ठरला. माझ्यावर त्यांचे खूप प्रेम होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, हे माझे भाग्य आहे. त्यांचे संगीत भावविभोर करणारे आहे, माझ्या ५० वर्षांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीत स्टेजवर एवढा चांगला आर्केस्ट्रा मी ऐकला नाही. जी मंडळी इथे गायिली, ते आजचे व उद्याचे पार्श्वगायक आहेत. हे सर्व कलाकार व्यावसायिक पार्श्वगायक होण्यासाठी तयार झाले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो.”

यानिमित्त झालेल्या ‘री-डिस्कव्हरींग पंचम’ या विशेष कार्यक्रमाची संकल्पना पुण्यातील सुरज दोशी, आनंद घोगरे आणि गौरव प्रभुणे या कलाकारांची होती. कार्यक्रमात व्हायोलिन सेक्शन, ब्रास सेक्शन, गिटार सेक्शन अशी विविध वाद्ये वाजवणाऱ्या सुमारे ६० हून अधिक कलाकारांचा संच रंगमंचावर होता. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांचा विशेष सहभाग होता. जितेंद्र भूरूक, रुपाली आनंद, विवेक पांडे, विजय जोशी हे सहगायक होते. कार्यक्रमाचे निवेदन संकर्षण कऱ्हाडे आणि योगिनी पोफळे यांनी केले.  पंचमदांनी संगीतबद्ध केलेली विविध गाणी व किस्से आदींचा आनंद रसिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading