Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

लहान मुलांमधील वाढते मधुमेहाचे प्रमाण चिंतादायक; मुलांना पूर्वीपासून चालत आलेले आहारसंस्कार देणे गरजेचे    – खासदार मेधा कुलकर्णी

पुणे : आज आई वडील दोघेही करियर व कामात व्यस्त असताना घरातील लहान मुलांना गुणवत्तापूर्ण (क्वालिटी टाईम) वेळ, इतर संस्कार यांसोबतच आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेले आहार विषयक संस्कार देणेही गरजेचे असल्याचे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये वाढते मधुमेहाचे प्रमाण हे चिंतादायक असल्याचेही त्या म्हणाल्या.

दोन्ही पालक करिअरमध्ये व्यस्त असताना घरातील लहान मुलांकडे होणारे दुर्लक्ष, व्हिडिओ गेम्स व आभासी दुनियेत रमणारी मुले, शिस्त लावणाऱ्या व वेळ प्रसंगी लाड करणाऱ्या आजी आजोबांचा कमी झालेला सहवास, जीवनशैलीत झालेले अनन्यसाधारण बदल यामुळे गेल्या काही वर्षांत लहान मुलांमधील मधुमेहाचे प्रमाण हे वाढत असून या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या आणि या वाढत्या समस्येविषयी जनजागृती करणाऱ्या राहुल पणशीकर दिग्दर्शित ‘अभिलाषा’ या लघुपटाचा शुभारंभाचा प्रयोग आज विधी महाविद्यालय रस्त्यावरील एनएफएआय येथे संपन्न झाला. त्यावेळी मेधा कुलकर्णी बोलत होत्या. जागतिक मधुमेह दिन आणि बालदिनाचे औचित्य साधत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘राहुलस् ग्राफिक्स’ या संस्थेच्या वतीने या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून फ्लिटगार्ड फिल्टर्सचे विशेष सहाय्य यासाठी लाभले आहे. फ्लिटगार्ड फिल्टर्सचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, फिटर या फिटनेस व न्यूट्रिशन या क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संस्थेचे संस्थापक बाला कृष्ण रेड्डी, लघुपटाच्या संगीत दिग्दर्शिका अपर्णा पणशीकर, मधुमेह तज्ज्ञ डॉ आश्विनी जोशी, लघुपटाची संपूर्ण टीम, मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.

आज शाळेमध्ये मुलांना शिस्त लावली तर शिक्षकांना दोषी धरल्या जाते. घरामध्ये आपणच मुलांना मुभा देत असतो. आधी आजी आजोबा मुलांचे लाड करायचे तसे शिस्तही लावायचे पण आता आजी आजोबा हा ‘फॅक्टर’च आपल्या आयुष्यातून कमी झाला आहे. अशा परिस्थितीत आयुष्याचे गांभीर्य ओळखून लहान मुलांमध्ये होणाऱ्या मधुमेहाविषयी अभिलाषा हा लघुपट पालकांना एक दृष्टीकोन देऊन जातो, असे कुलकर्णी म्हणाल्या.

एकीकडे आपली जीवनपद्धती ही आज पूर्वीसारखी राहिली नाही. तर दुसरीकडे आपल्या सर्वांच्याच आयुष्यामधून शिस्त निघून गेली आहे. अशा परिस्थितीत सामाजिक विषया लहान मुलांमधील मधुमेहाविषयी जनजागृती करायची असेल तर चिरकाल टिकणारे असे दृकश्राव्य माध्यम गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले.

जगात भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून संबोधले जात असताना आयसीएमआरच्या आकडेवारीप्रमाणे आज भारतातील ११.४ टक्के म्हणजेच १०.१ कोटी नागरिक हे मधुमेहाने ग्रस्त आहेत. २०४५ पर्यंत हा आकडा १२.४ कोटी इतका वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दुसरीकडे ५३.१% नागरिकांना मधुमेह होण्याची शक्यता असून २०२१ या एका वर्षांत मधुमेहामुळे तब्बल ६ लाख ४८ हजार नागरीकांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती बाला कृष्ण रेड्डी यांनी दिली. मधुमेहापासून दूर रहायचे असेल तर कुटुंब स्तरावर काम करणे गरजेचे असल्याचे मत रेड्डी यांनी मांडले.

मधुमेहतज्ज्ञ अश्विनी जोशी यांनी ‘अभिलाषा’सारख्या लघुपटाच्या माध्यमातून लहान मुलांमधील वाढत्या मधुमेहाबद्दल जगजागृती होण्याची गरज अधोरेखित केली. ज्यांच्या कुटुंबात आज मधुमेह असलेले रुग्ण आहेत त्यांनी आपल्या पुढील पिढीला सुदृढ आणि मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे असल्याचे जोशी म्हणाल्या.

आज तांत्रिक गोष्टी आणि सामाजिक माध्यमे आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून त्यांना योग्य वेळी दूर सारत सकस, सुदृढ जीवनशैलीचा अंगीकार करणे गरजेचे आहे, असे मत राहुल पणशीकर यांनी व्यक्त केले. समीक्षा भटनागर आणि संजय कुलकर्णी यांनी आपले अनुभव कथन केले. राहुल पणशीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत आभार मानले.

अभिलाषा या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि एडीटिंग हे राहुल पणशीकर यांचे असून, मंदार बेडेकर यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. अपर्णा पणशीकर यांनी लघुपटाचे संगीत दिग्दर्शन केले असून समीक्षा भटनागर, श्रीजय देशपांडे व संजय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका लघुपटात आहेत. नरेश डोंगरवार यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

फ्लिटगार्ड फिल्टर्सने याआधीही आपल्या सीएसआर उपक्रमांअंतर्गत अशा अनेक सामाजिक विषयांवरील त्यातही खासकरून आरोग्य विषयक लघुपट बनविण्यास मदत केली आहे हे विशेष.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading