संत साधू वासवानी यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त पुण्यात वार्षिक साधू वासवानी रथयात्रा उत्साहात
– पवित्र मंत्रोच्चारांनी पुन्हा एकदा गुंजले पुणे शहरातील रस्ते
– दि. २५ नोव्हेंबर रोजी जागतीक शाकाहारी दिवस (मीटलेस डे) पाळण्याचे आवाहन
“सर्व जीवन हे पवित्र आहे, कारण संपूर्ण सृष्टी हे एक कुटुंब आहे”
– साधू टी.एल. वासवानी
संत साधू वासवानी यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील साधू वासवानी मिशनतर्फे दि. २३ नोव्हेंबर रोजी वार्षिक रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाचे यंदा ५८ वे वर्ष होते.
सन १९६६ पासून या उत्सवाची परंपरा सुरू आहे. प्रामुख्याने अहिंसा आणि प्राण्यांच्या हक्कांसाठी नागरिकांना या रथयात्रेच्या माध्यमातून आवाहन केले जाते. यामध्ये जगभरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, हे या उत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
साधू वासवानी मिशन येथून सायंकाळी ५ वाजता ही मिरवणूक सुरू झाली आणि पुणे कॅम्प परिसरातल रस्त्यांवरून निघून रात्री ८ वाजता साधू वासवानी मिशनच्या परिसरात तिची सांगता झाली.
साधू वासवानी यांची भव्य प्रतिमा आणि दादा जे. पी. वासवानी यांचा उभा पुतळा असलेला रथ, अंतरिक्ष यानासारखे वाहन हे यात्रेचे वैशिष्ट्य ठरले. पुणे कॅम्प परिसरमार्गे सुमारे ५ किलोमीटरची यात्रेचा या रथातून प्रवास झाला. साधू वासवानी मिशनच्या प्रमुख दीदी कृष्णा कुमारी यांनी या रथयात्रेचे नेतृत्व केले आणि सहभागी साधक आणि नागरिकांना प्रसादाचे वाटप केले. या भारावलेल्या वातावरणाने पुणे शहरातील प्रमुख रस्ते आणि तेथून जाणारे नागरिक भक्तिभावात न्हाऊन निघाले.
प्राण्यांबद्दल दयाभाव आणि करूणा व्यक्त करणारे विविध संदेश दर्शवत या मिरवणुकीत जनजगृती करण्यात आली. या रथयात्रेत भजन आणि कीर्तन गाणाऱ्यांसह शेकडो साधक चालत आणि जप करत होते.
पदमजी कंपाउंड आणि कोहिनूर हॉटेल या दोन ठिकाणी रथयात्रा थांबली. त्यावेळी दादा जे. पी. वासवानी यांचे रेकॉर्ड केलेले भाषण उपस्थित भाविक आणि साधकांना ऐकवण्यात आले. या माध्यमातून भक्तिभाव आणि अहिंसा-प्रेमाचा संदेश देया साधकांना प्रेरणा देण्यात आली.
यावेळी बोलताना दीदी कृष्णा कुमारी म्हणाल्या, की “संत साधू वासवानी यांनी सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश दिला.” यावेळी दीदींनी आपल्या करुणापर संदेशाद्वारे नागरिकांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी शाकाहारी दिवस अर्थात मीटलेस डे पाळण्याचे आवाहन केले. नैसर्गिक आरोग्य जपण्यासाठी आणि सृदृढतेसाठी शाकाहार हा सर्वोत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले.
या रथयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी खास माॅरिशस येथून आलेल्या एक साधक बीना यांनी सांगितले, “रथयात्रेत सहभागी होणे, हा माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट असा अनुभव राहिला. यात सहभागी झाल्याने येथील भावपूर्ण वातावरणाने मला आध्यात्मिकतेची दृष्टीने वाटचाल करण्याची आणखी प्रेरणा दिली आहे.”
