Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

‘सूर महती’ महोत्सवाच्या माध्यमातून स्व. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांना वाहण्यात आली आदरांजली

पुणे :  ज्येष्ठ कलाकारांसोबतच युवा कलाकारांनी आपल्या सादरीकरणाच्या माध्यमातून स्व. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांना आदरांजली अर्पण केली. निमित्त होते डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य व प्रसिद्ध गायक अतुल खांडेकर यांच्या सूर महती फाउंडेशनच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात येणारा दोन दिवसीय ‘सूर महती’ या सांगीतिक महोत्सवाचे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सदर महोत्सव नुकताच संपन्न झाला. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष होते.

यावेळी नरसिंह आश्रम स्वामी व चरणदास महाराज, विलास जावडेकर, पराग  गाडगीळ, हरी सहस्त्रबुद्धे, निर्मलाताई गोगटे, आशा खाडीलकर हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या असलेल्या तरुण गायिका – शमिका भिडे कोरगावकर आणि स्वरांगी मराठे-काळे यांच्या सहगायनाने झाली. त्यांनी मधुवंती रागामधील त्यांच्या गुरुंनी रचलेल्या तीन बंदिशी सादर करून महोत्सवाचा सुरेल आरंभ केला. यानंतर दुर्गा रागामधील दोन चीजा आणि त्याला जोडून त्यांनी तराणा गायला. ‘अजपा जाप जपो भाई साधो’ या सुरेख कबीर भजनानी त्यांनी सांगता केली. यावेळी लीलाधर चक्रवर्ती (संवादिनी), ऋग्वेद देशपांडे (तबला) यांनी समर्पक साथसांगत केली.

यानंतर किराणा घराण्याचे मशकूर अली खान यांचे शिष्य असलेले अंबरीश दास यांच्या दमदार गायन रंगले. त्यांनी राग मारूबिहाग प्रस्तुत केला. ख्याल गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या दास यांनी ‘मेरो रसिया लागी आखिय़ाँ…’ ही रचना सादर करीत वाह वाह मिळविली. त्यांना सौमित्र क्षीरसागर (संवादिनी), पार्थ ताराबादकर (तबला) यांनी साथसंगत केली. महोत्वाच्या पहिल्या दिवसाचा समारोप पद्मश्री उस्ताद शाहिद परवेझ खान यांच्या बहारदार सतारवादनाने झाला. त्यांनी प्रस्तुत केलेल्या राग बागेश्रीने संपूर्ण नाट्यगृह सतारीच्या सुरांनी भारावून गेले. ‘याद करू ध्यान करू माते सरस्वती’ ही रचना सादर करीत त्यांनी सांगता केली. यावेळी तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी तबला तर उमंग धडफळे यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

सूर महती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात स्वत: अतुल खांडेकर यांच्या सुमधुर गायनाने झाली. त्यांनी राग गावती मधील तीन रचना सादर केल्या. त्यांच्या गायनामधून त्यांच्या गुरुप्रती असलेला नितांत आदर व्यक्त होत होता. अतुल खांडेकर यांना निरंजन लेले (संवादिनी), ऋग्वेद देशपांडे (तबला),  भक्ती देशपांडे व शिरीष दाणी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. रोहिणी भाटे यांच्या शिष्या आणि प्रख्यात कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचे नृत्य रंगले. गुरुंनी रचलेल्या गणेश वंदनेनी त्यांनी नृत्याला सुरुवात केली. सोळा मात्रांचा तीन ताल नजाकतीने पेश करीत रसिकांची वाहवा मिळवली. या पाठोपाठ कालीचरण, संवाद आणि बिंदादिन महाराजांची कृष्णावर रचलेली ठुमरी त्यांनी प्रस्तुत केली. द्रौपदी वस्त्रहरण आणि ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आयेंगे’ या पुष्पमित्र यांनी रचलेल्या कवितेवर नृत्यसादर करीत त्यांनी रसिक प्रेक्षकांना भारावून टाकले. जमेनीस यांना निखील फाटक (तबला), मनोज देसाई (संवादिनी व गायन), धवल जोशी (बासरी), व वैष्णवी देशपांडे (पढंत) यांनी साथ संगत केली.

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप झाला. त्यांनी राग बिहागडा मधील दोन सुंदर बंदिशी गात रसिकांवर आपल्या सुरांची मोहिनी घातली. त्यानंतर राग बसंती – केदार सादर केला. भैरवीने महोत्सवाची सांगता झाली. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन स्वानंद पटवर्धन यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading