कर्करुग्णांनी काढले ‘सीआयएमएस’ विषयी गौरवोद्गार
‘दिवाळी वुईथ अ पर्पज २०२४’ उपक्रम उत्साहाने साजरा
पुणे : गरजू रुग्णांना दुर्लक्षित केल्याच्या अनेक बातम्या येतात, पण केवळ गरजू नव्हे तर, कर्करोगाच्या प्रगत अवस्थेतील रुग्णही केअर इंडिया मेडिकल सोसायटी अर्थात सीआयएमएसच्या विश्रांती हॉस्पिटलविषयी गौरवोद्गार काढताना प्रेक्षकांनी नुकतेच अनुभवले. अनेक कर्करुग्ण व्यासपीठावर येत साश्रू नयनांनी विश्रांती हॉस्पिटलविषयीची अपार कृतज्ञता मोकळेपणाने व्यक्त करत होते. निमित्त होते, केअर इंडिया मेडिकल सोसायटी (सीआयएमएस) आयोजित ‘दिवाळी वुईथ पर्पज २०२४’ या वार्षिक उपक्रमाचे. पुण्याच्या कमांड हॉस्पिटल येथील चरक सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक कर्करुग्ण, त्यांचे पालक, नातेवाईक आवर्जून उपस्थित होते.
आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस (एएफएमएस)च्या महासंचालिका सर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. एएफएमएसचे संचालक लेफ्टनंट जनरल संदीप तरेजा, कमांड हॉस्पिटल, पुणेचे कमांडंट मेजर जनरल बी. नंबियार, केअर इंडिया मेडिकल सोसायटीचे संस्थापक विश्वस्त कर्नल (नि) एन. एस. न्यायपथी, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. वत्सला स्वामी, दिल्ली येथील ‘द हंस फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कपूर तसेच केअर इंडिया मेडिकल सोसायटीचे विश्वस्त लेफ्टनंट जनरल (नि) एम. ए. तुटकणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या पूर्वार्धात विविध प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णांनी केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि त्यांचे विश्रांती हॉस्पिटल याविषयीचे हृद्य मनोगत मांडले. विश्रांती हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवताच इथले प्रसन्न वातावरण, हसतमुख स्टाफ आणि कमालीची स्वच्छता, यामुळे रुग्ण निम्मा बरा होतो, मग उरलेला रोग बरा करण्याचे काम इथले तज्ज्ञ डॉक्टर करतात असा अनुभव प्रत्येकाने सांगितला.
आर्थिक दुरवस्थेमुळे कर्करोगाचे महागडे उपचार, निदान प्रक्रिया, औषधे, केमो आणि रेडिएशन हे ज्या रुग्णांना परवडत नाही, त्यांना इथे अतिशय आपलेपणाने, जिव्हाळ्याने अत्याधुनिक उपचार मिळतात, असे अनुभव या रुग्णांनी कथन केले. रुग्णांनी उत्स्फूर्तपणे मांडलेल्या मनोगतांतून व्यक्त झालेल्या भावनांचा मान राखत संपूर्ण सभागृहाने केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पिटल येथे कार्यरत सर्व टीमला उभे राहून मानवंदना दिली.
तोच धागा पकडून एएफएमएसच्या महासंचालिका आरती सरीन म्हणाल्या, “केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पिटल यांची रुग्णसेवेप्रती असणारी निष्ठा आणि बांधिलकी कौतुकास्पद आहे. ३० वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवेचे व्रत त्यांनी सांभाळले आहे. अत्याधुनिक आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा, सेवाभावी वृत्तीने कार्य करणारा सर्व स्टाफ यामुळे असे अनन्यसाधारण सेवाकार्य शक्य झाले आहे. या कार्यात आपण सोबत आहोत आणि एकमेकांना सतत मदत करत आपण एकत्र राहू.”
लेफ्टनंट जनरल संदीप तरेजा म्हणाले, “कर्करोगाचे निदान झाले की, व्यक्ती आधी खचते. त्यामुळे कर्करुग्णांना उपचारासोबत आधार, खंबीर पाठिंबा लागतो. या रोगाशी आपण एकत्र लढू, हा विश्वास रुग्णांच्या मनात दृढ केला की, उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात. विश्रांती हॉस्पिटलमध्ये रुग्णांना असे विश्वास जागवणारे उपचार मिळतात, हे उल्लेखनीय आहे.”
मेजर जनरल नंबियार यांनी रुग्णांच्या मानसिकतेचा विचार करून जे उपचार केले जातात ते जास्त प्रभावी ठरू शकतात, असे मत मांडले. कर्करोग निदान, उपचार, शस्त्रक्रिया आणि नंतरच्या थेरपीज यांच्या व्यवस्थापनाचे कौशल्य कमालीचे असल्याचे सांगितले.
दिल्ली येथील ‘द हंस फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कपूर म्हणाले, “गंभीर रोगाला धैर्याने सामोरे जाणे आणि तशी वृत्ती रुग्णांच्या मनात जाणवणे, ही जादू विश्रांती हॉस्पिटल आणि केअर इंडिया मेडिकल सोसायटीने सातत्याने करून दाखवली आहे.” या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन तसनीम शेख यांनी केले. अमिता प्रदीप आणि आयेशा शेख यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. वत्सला स्वामी यांनी आभार मानले.
