सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचा डॉ. दा. वि. नेने स्मृती पुरस्काराने सन्मान
पुणे : पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा यांना डॉ. दा. वि. नेने स्मृती पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना प्रदान करीत त्यांचा सन्मान करण्यात आला. कर्वेरस्ता, कोथरूड येथील स्वामीकृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रुपये १० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्कार स्वीकारल्या नंतर पोंक्षे यांनी ‘आज सावरकर असते तर…’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पोंक्षे म्हणाले, “सन १९४६ पासून सावरकर सांगातात ते खरे होताना पाहून त्यांची व हिंदू महासभेची ताकत वाढत होती. अशा परिस्थितीत आपण १९५२ च्या निवडणुकांना कसे सामोरे जाणार हा प्रश्न नेहरूंना भेडसावत होता व ते एका चमत्काराची अपेक्षा करत होते. तो चमत्कार घडवला तो नथुराम गोडसे यांनी. गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ ला गांधीची हत्या केली. ब्राम्हण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे तात्याराव सावरकर बदनाम झाले. एका दैदिप्यमान अशा कारकीर्दीवर काळा डाग लावण्याची आयती संधी नेहरूंकडे चालून आली. सावरकरांना गांधी हत्येच्या कटात सामील असल्याचा ठपका ठेवत आरोपी क्रमांक ८ बनवण्यात आले.”
कोर्टात संपूर्णतः निर्दोष सुटून आजही कॉंग्रेसचे असे नेते जे स्वतः पुराव्याअभावी जामिनातीवर जेलबाहेर आहेत, ते नेते सावरकर गांधी हत्येत सहभागी होते परंतु पुराव्याअभावी सुटले असा कांगावा करत असतात असे सांगत शरद पोंक्षे म्हणाले, “स्वतः सुप्रीम कोर्टात ५ वेळा माफी मागणारा कॉंग्रेसचा नेता जेव्हा मी सावरकर नाही मी माफी मागणार असे म्हणतो तेव्हा फार गंमत वाटते. आज स्वातंत्र्यवीर सावरकर जाऊन ५८ वर्षे लोटली असली तरी दर २ महिन्यांनी कॉंग्रेसला त्यांच्यावर चिखलफेक करण्याची इच्छा होते. यावरूनच आजही त्यांच्यावर असलेली सावरकरी विचारांची दहशत कायम असल्याचे चित्र आहे.”
स्वातंत्रपूर्व काळात १९३७ साली निर्बंधांमधून मुक्त झाल्यावर सावरकरांना कॉंग्रेसमध्ये सामील होण्याचे निमंत्रण होते. बऱ्याच भारतीयांना वाटत होते की सावरकर आता कॉंग्रेसमध्ये जाऊन गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील. परंतु कॉंग्रेसने स्वीकारलेल्या हिंदी राष्ट्रवाद व त्यातून निर्माण झालेलं पराकोटीच मुस्लीमांच लांगुनचालन यामुळे सावरकरांनी सदर प्रस्तावास नकार दिला. मोठ्या प्रमाणात विजयी इतिहास असताना देखील आम्हाला कायमच आमच्या पराभवाचा इतिहास शिकवला जातो आम्ही जर इतके जास्त वेळा पराभूत झाले असतो तर आज हिंदू म्हणून जगू शकलो नसतो, असे परखड मत शरद पोंक्षे यांनी मांडले.
याआधी भाषण करताना भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे की सावरकरांचे तत्वज्ञान त्यांचा विचार हा आज आपल्या देशाचा मूळ प्रवाह बनला आहे. सावरकरांना आपले राष्ट्र हे नैतिकदृष्ट्या उत्तम, लौकिक दृष्ट्या समृद्ध आणि सुरक्षेच्या दृष्टीने सामर्थ्यवान असायला हवे होते. आधुनिक काळात सावरकरांचे विचार समर्थपणे मांडणाऱ्या शेषराव मोरे यांनी जाहीरपणे असे म्हणले आहे की नथूराम गोडसेने झाडलेल्या पहिला गोळीने गांधीचे प्राण गेले, दुसऱ्या गोळीने सावरकरांची पुण्याई संपुष्टात आणली व तिसऱ्या गोळीने हिंदूंचा कैवार घेण्याचे कार्य दीर्घकाळ अस्पृश्य बनले.
चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले. गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी यावेळी पुरस्कारामागील उद्देश सांगत डॉ. दा. वि. नेने यांबद्दल माहिती दिली. शुभदा वर्तक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
