Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासह 7 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

 

नागपूर  : महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी गत दहा वर्षापासून सुरु केलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून आता अनेक पायाभूत सेवा सुविधांसह विकासाचे नवे समृद्ध मार्ग खुले झाले आहेत. आज महाराष्ट्रातील दहा वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ होत आहे. विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध विकास कामांची पायाभरणी होत आहे. शिर्डी विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी, इंडियन इन्स्टीट्युट ऑफ स्किल्स मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्राचा शुभारंभ होतांना मला अतिशय आनंद होत असून एका अर्थाने ही स्वस्थ आणि समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व इतर प्रकल्पांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त नागपूर येथील विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या विशेष सभा मंडपात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष तर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा, किंजरापु राममोहन नायडू, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

एका आठवड्यापूर्वी ठाणे व पुणे येथे सुमारे 30 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा आपण शुभारंभ केला. याच बरोबर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात हजारो कोटींची विकास कामे केली जात आहेत. अमरावती येथे टेक्सटाईल पार्क आपण साकारत आहोत. अनेक महानगरात मेट्रोचा विस्तार होत आहे. सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण मोठ्या प्रमाणात सुरु केले आहेत. महामार्गाची कामे सुरु आहेत. पायाभूत विकासाच्या सर्व क्षेत्रासमवेत आपण सर्वसामान्यांचे आरोग्य, शेती, शेतकरी आणि पशुपालकांसाठी विकासाची नवे मार्ग उपलब्ध करुन दिले आहेत. भारतातील कंटेनरचा सर्वात मोठा पोर्ट आपण वाढवण बंदरात साकारत असून या सर्व विकासाचा केंद्र बिंदू हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आपण ठेवला असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

युवकांसाठी एक आश्वासक वातावरण आपण दिले आहे. काही दिवसांपूर्वी मराठीला आपण अभिजात भाषेचा दर्जा देऊन करोडो मराठी माणसांचा अप्रत्यक्ष गौरव केला आहे. हे काम आपण जनता जनार्दनाने दिलेल्या आर्शिवादामुळे शक्य झाले आहे. राज्यातील प्रत्येक क्षेत्रात साध्य झालेला विकास हा आपण दिलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे या भाषेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गौरव केला.

विदर्भ विकासासह राज्यातील आरोग्य सुविधेला गती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माणगाव जिल्हा रायगड येथून बोलताना म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या अखंडतेचा, समता-बंधुता आणि एकतेची शिकवण दिली. त्यांच्या नावाने असलेल्या नागपूरच्या विमानतळावर एकीकृत टर्मिनल साकारले जात आहे. या नव्या टर्मिनलमुळे एका वेळी शंभर विमानांची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळणार असल्याचे ते म्हणाले. शिर्डीलाही आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व आहे. अध्यात्मिक दृष्ट्या, तीर्थस्थळ म्हणून जग शिर्डीकडे पाहते आहे. याठीकाणी साडेसहाशे कोटीं खर्चून एकीकृत टर्मिनल उभारतो आहोत. यामुळे शिर्डीतील पर्यटन वाढेल. त्यातून रोजगार आणि सेवा संधीही वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकाच दिवशी दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करतोय. खरंतर हा विक्रमच आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण सुविधांना केंद्रातील सरकारनंही पाठबळ दिलंय असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

एकाच शैक्षणिक वर्षात मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयांमुळं ग्रामीण व दूरस्थ भागात विशेषोपचार आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सातत्याने पाठबळ मिळते आहे त्यासाठी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचे आभार मानले.

राज्याच्या गौरवाचा हा क्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या हवाई वाहतूक, पायाभूत विकासासह आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत मोलाचा आहे. नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे. येथील पायाभूत विकासासाठी, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात यासाठी, येथील कृषी उत्पादनांना जलद वाहतुकीच्या सुविधा मिळाव्यात यासाठी, येथील उद्योग क्षेत्राला गती देण्यासाठी मी मुख्यमंत्री असतांना मिहान प्रकल्पाला गती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास कामांसह कार्गो वाहतुकीसाठी स्वतंत्र धावपट्टी हा मिहानचा कणा आहे हे लक्षात घेऊन आपण जीएमआर कंपनीला सर्व अटी-शर्तींची पुर्तता करुन काम बहाल केले होते. परंतु मधल्या काळात हे काम रखडल्या गेले. या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालायाने निकाल दिल्यामुळे अतिशय कमी काळात पुन्हा प्रशासकीय प्रक्रीया जलद गतीने पूर्ण करुन याची पायाभरणी करतांना विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सुमारे 7 हजार कोटी रुपये खर्चातून उभारणाऱ्या या प्रकल्पात 3 लाखा स्क्वेअर फुट अशी सुसज्ज इमारत साकारली जाणार आहे. यात स्वतंत्र धावपट्टी निर्माण केली जाणार आहे. देशातील सर्वात चांगली इमारत म्हणून याचा गौरव होईल. साधारणत: 1 कोटी 40 लाख प्रवाशांची वाहतूक क्षमता असलेले विमानतळ म्हणून येथील सुविधा आता भक्कम होतील. जवळपास 9 लाख टन कार्गो येथून हाताळला जाईल, असे त्यांनी सांगितले. यातून महत्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून नागपूर आता नावारुपास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मध्य भारतातील याला असलेले भौगोलिक स्थान लक्षात घेता शेजारील राज्यांना याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.

आज महाराष्ट्रात 10 वैद्यकीय महाविद्यालय सुरु होत आहेत याचा आनंद आहे. मी अर्थमंत्री असतांना प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशी आपण संकल्पना मांडली होती. तेव्हा 8 वैद्यकीय महाविद्यालयांस मान्यता दिली होती. यात विदर्भातील 5 वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश असल्याचे ते म्हणाले. यात बुलढाणा, वाशिम, अमरावती, भंडारा व गडचिरोली यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ही स्वप्नपूर्ती पाच वर्षाच्या संघर्षाला यशाचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव केला. विदर्भातील कृषी, पर्यटन क्षेत्राला यातून मोठी झेप घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मिहान विस्तारामुळे सुमारे 68 हजार रोजगार निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या मनोगतात वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयाचा आढावा मांडला.

या कार्यक्रमास आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार परिणय फुके, कृपाल तुमाने, आमदार प्रविण दटके, आमदार आशिष जयस्वाल, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल, व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाण्डेय आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading