Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

अपक्ष उमेदवार उभे करून भाजपने ही निवडणूक जिंकली – खासदार संजय राऊत

मुंबई:  हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय महान वगैरे नाही. अपक्ष उमेदवार उभे करून भाजपने ही निवडणूक जिंकली आहे. मात्र, अखेर जो जिंकतो तो सिकंदर ही वस्तुस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

इंडी आघाडी लढली असती तर…

हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हटवादीपणा करून इंडी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरवली नाही. आम आदमी पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना एक- दोन जागा दिल्या असत्या तर मत विभाजन तळून निवडणुकीचे चित्र कदाचित वेगळे दिसले असते, असा दावा राऊत यांनी केला. 

काँग्रेस आणि भाजपचे धोरण एकच 

ज्या राज्यात काँग्रेस प्रबळ असते त्या राज्यात काँग्रेसकडून प्रादेशिक पक्षांना खिजगणतीतही घेतले जात नाही. या बाबतीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांचे धोरण एकच आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने छोट्या पक्षांना विश्वासात घेतले असते तर भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे शक्य होते, असा दावाही राऊत यांनी केला. 

महाराष्ट्रातील निवडणुकीवर परिणाम नाही 

हरियाणातील निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आत्मविश्वास दुणावला आहे. रावसाहेब दानवे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने हरियाणातील निवडणुक निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, हरियाणातील निकालाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे. हरियाणात भाजपच विजय झाला तर जम्मू कश्मीरमध्ये त्यांचा पराभव झाला. अर्थात एक राज्य भाजपने जिंकले तर एक राज्य इंडी आघाडीने जिंकले. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची महाविकास आघाडी भक्कम आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सजग आहे. त्यामुळे हरियाणा निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडणे अशक्य आहे, असेही राऊत म्हणाले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading