लल्लुभाई कंपाऊंड मधील 19 इमारतींच्या दुरुस्ती कामाला सुरवात
खा. संजय दिना पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
मुंबई – मानखुर्द, शिवाजीनगर विधानसभेतील लल्लुभाई कंपाऊंड येथील हिरानंदानी आकृतीच्या १९ इमारतींच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्या हस्ते झाला. एमएमआरडीएच्या एक्झिट एक्शन पॉलिसी अंतर्गत हे काम करण्यात येणार आहे.
लल्लुभाई कंपाऊंड येथील हिरानंदानी आकृतीच्या १९ इमारतींचे दुरुस्तीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. स्थानिक रहिवाशी जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहत होते. याबाबत त्यांनी प्रशासकीयस्तरावर पत्रव्यवहार करुनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्रस्त झालेल्या सर्व रहिवाश्यांनी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या. याबाबत खा. संजय दिना पाटील यांनी तात्काळ प्रशासकीय स्तरावर पाठपुरवठा करुन हे प्रकरण मार्गी लावले. एमएमआरडीएच्या ‘एक्झिट एक्शन पॉलिसी’ अंतर्गत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खा. संजय दिना पाटील यांचे आभार स्थानिक रहिवाश्यांनी मानले.
