Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले; प्रत्येकाच्या वाट्याला येणार ‘एवढ्या’ जागा

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. या सूत्रानुसार काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रत्येकी शंभर जागा लढविणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ८४ जागा देण्यात येणार आहेत. इतर मित्र पक्षांसाठी चार जागा ठेवण्यात येणार आहेत. 

महाविकास आघाडीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आणि काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे जास्त जागा मिळाव्या, अशी काँग्रेसची मागणी होती तर आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा कायम दावा राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेलाही इतर घटक पक्षांपेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा होती. लोकसभा निवडणुकीत कमी जागांवर निवडणूक लढवूनही चांगल्या स्ट्राईक रेटने खासदार निवडून आणल्यामुळे लोकसभेतील कमी जागांची भरपाई विधानसभेच्या अधिक जागांद्वारे करून दिली जावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी होती. 

मात्र, जागा वाटपाबाबत तीनही महत्त्वाच्या घटक पक्षांमध्ये एकमत झाले असून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी शंभर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ८४ आणि इतर मित्रपक्ष चार असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. लवकरच महाविकास आघाडीकडून जागावाटपाची घोषणा आणि उमेदवार निश्चिती केली जाईल आणि प्रत्यक्ष प्रचार मोहिमेत आपण आघाडी घेऊ, असा दावा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ सूत्रांनी केला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading