Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

पाकिस्तानी ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ला राज्यात प्रदर्शित करण्यास राज ठाकरेंचा विरोध

मुंबई:  पाकिस्तानी चित्रपटाला भारतात, विशेषतः महाराष्ट्रात पायघड्या घालणे महागात पडू शकते, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी चित्रपटाचे प्रदर्शन कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात करू देणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे. 

फवाद खान आणि माहीरा खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला द लेजंड ऑफ मौला जट्ट हा पाकिस्तानी चित्रपट 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला राज ठाकरे यांचा विरोध आहे. कलेला देशांच्या सीमा नसतात वगैरे इतरांच्या बाबतीत ठीक आहे. मात्र, केवळ भारत द्वेषावर जगलेल्या पाकिस्तानला, त्यांची कला आणि कलाकारांना भारतात स्थान देता कामा नये, असे ठाकरे म्हणाले. हा चित्रपट भारतात कुठेच प्रदर्शित होऊ नये, अशी आपली इच्छा आहे. मात्र, इतर राज्यांनी त्यांचे निर्णय घ्यावे. महाराष्ट्रात मात्र मनसे हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनांनी देखील हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

हा चित्रपट ज्या काळात महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाणार आहे त्याच काळात नवरात्र साजरे केले जाणार आहे. या सणासुदीच्या आणि उत्साहाच्या काळात राज्यात तणावाचे आणि संघर्षाचे वातावरण असता कामा नये अशी आपली भूमिका आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिसांची देखील असणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने या चित्रपटाचे प्रदर्शन रोखणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

उरी येथे सन 2016 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी चित्रपट आणि कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. यापूर्वी फवाद खान आणि माहीरा खान यांनी बॉलीवूडच्या चित्रपटात काम केले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading