शिक्षण आणि उद्योग क्षेत्राने एकत्र येणे काळाची गरज – चंद्रकांत पाटील
पुणे : देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र, शिक्षण संस्थांमधील अध्यापक – विद्यार्थी यांच्यासह उद्योग विश्वातील तज्ज्ञ यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योगविश्व यांचे समीकरण जमले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशित्रण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, जम्मूने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या पुणे गोलमेज परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आयआयएम जम्मूच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ मिलिंद कांबळे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, आयआयएम जम्मूचे संचालक डॉ. बी. के. सहाय, आयआयएम जम्मूच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य श्रीकांत बडवे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
आयआयएम जम्मूच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या गोलमेज परिषदेमध्ये शैक्षणिक संस्था व उद्योग क्षेत्र यांमधील समन्वय साधत भागीदारी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘फॉस्टरिंग ॲकॅडमिक – इंडस्ट्री पार्टनरशिप्स – द वे अहेड’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. या गोलमेज परिषदेत पुणे आणि परिसरातील अनेक महत्त्वाच्या व आघाडीच्या कंपन्या, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.
परिषदेत शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील भागीदारी वाढविण्यासंदर्भात, ‘नेव्हिगेटिंग दी फ्युचर ऑफ वर्क्स – इंटिग्रेटिंग एआय एथिकल प्रॅक्टिसेस अँड ह्युमन सेंट्रिक स्किल्स’ आणि नवे शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कॉर्पोरेट्सची भूमिका या विषयांवर चर्चासत्रे संपन्न झाली. यामध्ये शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.
उद्योजकीय मानसिकता घडवणे आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे, हाच नव्या शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे, असे सांगून पाटील म्हणाले, “शिक्षणाचा १०-२–३ हा पॅटर्न काळानुरूप बदलून, केंद्र सरकारने शैक्षणिक धोरण नव्याने आखले आणि त्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे, ही आनंदाची बाब आहे. शिक्षण आणि रोजगार, शिक्षण आणि व्यवसाय, शिक्षण आणि उद्योग ही एकमेकांपासून दूर अंतरावरची केंद्रे न राहता, त्यांचे योग्य ते समीकरण जुळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यात ऊस, साखर कारखाने यांच्याशी निगडीत अभ्यासक्रम, सोलापूर मध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी अनेक अभियांत्रिकी तसेच तंत्रशिक्षण संस्था, विद्यापीठांना स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. उद्योगविश्वाची गरज पूर्ण करणारे शिक्षण मिळावे, हा हेतू यामागे आहे’.
आयआयएम जम्मूचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी शिक्षण आणि उद्योगक्षेत्राच्या भवितव्याच्या दृष्टीने ही क्षेत्रे परस्परपूरक झाली पाहिजेत, असे मत व्यक्त केले. ‘उद्योगांच्या गरजा आणि शैक्षणिक संस्थांमधील शिक्षण, यांच्यात पूल बांधला जाण्यासाठी आयआयएम जम्मू करीत असलेल्या प्रयत्नांचे कांबळे यांनी कौतुक केले. जागतिक अर्थकारणाच्या सातत्याने बदलणाऱ्या गरजा पूर्ण कऱण्यासाठी नवकल्पना आणि प्रयोगशीलतेचा स्वीकार आवश्यक आहे. त्यासाठी आयआयएम जम्मू विविध शैक्षणिक संस्था आणि उद्योग, यांच्याशी सामंजस्य करार करेल, असेही ते म्हणाले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रभावी नेतृत्व आणि नैतिक आचरणाच्या संस्कारांचे महत्त्व सांगितले. तंत्रज्ञानाची अपरिहार्यता आणि मानवता, यांच्यात योग्य समतोल साधणारे शिक्षण अभिप्रेत आहे. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या भवतालाशी जुळवून घेणे विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. त्यासाठी शिक्षण आणि उद्योगविश्व, यांची सांगड जमली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
राजेश पांडे यांनी उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक संस्था ही संवादी क्षेत्रे झाली पाहिजेत आणि संशोधन प्रयोगशाळांचे उपक्रम परस्परपूरक असावेत, असे मत व्यक्त केले.
देवांश मेहरा यांनी सूत्रसंचालन केले.
