Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

विकसित भारत हे तरुणांचे लक्ष्य असले पाहिजे – डॉ. मनसुख मांडविया यांचे मत

पुणे : देशाला विकसित बनविण्यासाठी तरुणांनी पुढे या, हे तरुणांचे कर्तव्य आहे. श्रम करा, त्यापासून पळू नका. तुम्ही कुठेही जा तुमची प्राथमिकता देश असली पाहिजे. जिथे असाल तिथे देशाप्रती कसे योगदान द्याल याचा विचार करायला पाहिजे. विकसित भारत हे तरुणांचे लक्ष्य असले पाहिजे, असे मत युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केले.

भारत शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहयोगाने माय भारत विकसित भारत २०४७ युवा कनेक्ट महाराष्ट्र अध्यायाची सुरुवात  शिक्षण प्रसारक मंडळीच्या लेडी रमाबाई सभागृहात झाली. यावेळी मा. केंद्रीय राज्य मंत्री श्रीमती रक्षा खडसे, नेमबाज स्वप्निल कुसाळे, शि. प्र. मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष एस. के. जैन,  नियामक मंडळ सदस्य ॲड. दामोदर भंडारी, नियामक मंडळ सदस्य तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष श्री अशोक वझे, संस्थेच्या सचिव डॉ. राधिका इनामदार इ. उपस्थित होते.

डॉ. मनसुख मांडविया म्हणाले, आपला देश सामर्थ्यवान देश आहे. बौद्धिक आणि मनुष्य शक्तीची आपल्या देशात कधीच कमी नव्हती. ज्या गतीने आपण प्रगती करायला हवी होती, ती पूर्वीच्या सरकाराच्या काळात झाली नाही. विकसित भारताचा रोड मॅप नरेंद्र मोदी यांनी दिला.

आपली कर्तव्यनिष्ठा जपत युवकांनी देशाच्या विकासात आपले योगदान दिले पाहिजे. देशाच्या प्रती कर्तव्य भावनेने काम करा तर भारत विकसित होईल. एक विचार, एक संकल्प घेऊन देशातील जनता पुढे येईल तेव्हा भारत १४० कोटी पावलांनी पुढे जाईल आणि भारत विकसित होईल.

रक्षा खडसे म्हणाल्या, पुणे हे युवकांचे शहर आहे. शिवरायांची कर्मभूमी, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांचा इतिहास शहराला लाभला आहे. म्हणून पुण्यापासून विकसित भारत महाराष्ट्र अध्यायाची सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या आधीच्या पिढीने चळवळ उभी केली. देशाच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज आपला देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांच्यानंतर विकसित भारतासाठी योगदान देणे ही आता आपली जबाबदारी आहे. पुढे येणारे भविष्य आपले आहे त्यामुळे प्रत्येकाचा वाटा यात असला पाहिजे. विकसित भारत या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून अनेक गोष्टी युवा शिकणार आहे. ज्यामुळे देशाच्या विकासासाठी त्याचा उपयोग होईल. देशाला प्रगतीकडे न्यायचे असेल तर युवकांचा सहभाग असायला पाहिजे.

नेमबाज स्वप्निल कुसळे म्हणाला, कोणतेही क्षेत्र असो आहार आणि फिजिकल फिटनेस नीट ठेवा. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. जिद्द आणि ध्येय ठेवा तर कोणत्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल, असेही त्याने सांगितले. ॲड. एस. के. जैन यांनी मान्यवरांचे स्वागत करून संस्थेची ओळख करुन दिली. डॉ. माधुरी देशपांडे व डॉ. मधुरा थिटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading