Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

नक्षलवाद्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी बस्तर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन

रायपूर:  शस्त्र खाली ठेवून आत्मसंर्पण केलेल्या भूतपूर्व नक्षलवाद्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यात व हिंसाग्रस्त कुटुंबातील युवकांमध्ये असलेली अविश्वासाची दरी कमी करण्यासाठी छत्तीसगड राज्य शासनाच्या वतीने बस्तर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कधी काळी रक्ताची होळी खेळलेले शरणागत नक्षलवादी आणि नक्षलग्रस्त भागातील सर्वसामान्य तरुण या खेळांच्या स्पर्धेत एकत्रितपणे उतरणार आहेत. 

मोडले नक्षलवाद्यांचे कंबरडे 

सध्याच्या काळात छत्तीसगडसह नक्षलग्रस्त राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी नक्षल विरोधी मोहीम प्रभावीपणे राबविली आहे. त्याचप्रमाणे नक्षलग्रस्त भागातील प्रशासनांनीही शिक्षण, आरोग्य आणि अन्य नागरी सुविधा उपलब्ध करून देऊन प्रामुख्याने आदिवासी समाजाला नक्षलवादापासून तोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांचे फळ म्हणून नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या बस्तरमध्येच नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून बस्तर ऑलिंपिकचे आयोजन करण्यात आले आहे. 

नक्षलवाद्यांच्या भरतीकडे युवकांची पाठ 

साधारणपणे नक्षलवादी टोळ्यांचे प्रमुख बस्तरच्या गावागावात जाऊन गावातील आदिवासी तरुणांची माथी भडकवण्याचे कार्य करतात. प्रस्थापित प्रशासकीय यंत्रणेबाबत त्यांच्या मनात संताप निर्माण करतात. द्वेषाची भावना निर्माण करतात आणि असे माथे भडकलेले तरुण नक्षलवादी टोळ्यांमध्ये भरती होतात. मात्र, सुरक्षा आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या पुढाकारामुळे, कायद्याचा बडगा आणि कल्याणकारी योजना यांच्या अंमलबजावणीमुळे आदिवासी तरुणांनी नक्षलवादी टोळ्यांकडून केल्या जाणाऱ्या भरतीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. युवकांना शिक्षण आणि खेळांचा पर्याय उपलब्ध करून दिल्यास ते हिंसाचारापासून दूर राहतील, याबद्दलचा विश्वास सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनामध्ये निर्माण झाला आहे. 

खेळाडू घडवण्यासाठी प्रोत्साहन

बस्तर ऑलिंपिकच्या माध्यमातून तालुका पातळीपासून विभागीय पातळीपर्यंत विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ऑलिंपिकचे उद्घाटन एक नोव्हेंबर रोजी होणार आहे. तालुका स्तरावरील स्पर्धा १ ते १५ या कालावधीत होणार असून १५ ते २० या कालावधीत जिल्हास्तरावरील स्पर्धा होणार आहे. विभागीय स्तरावरील अंतिम फेरीच्या क्रीडा स्पर्धा जगदलपूर येथे पार पडणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कम आणि पदके देण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या आवडीच्या क्रीडा प्रकारात भवितव्य घडविण्यासाठी सर्व प्रकारची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading