Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

‘ईश्वरपुरम्’च्या नागा विद्यार्थ्यांनी पुणेकरांना घडविले आदिवासी नृत्याचे दर्शन

पुणे : विविधतेने नटलेल्या आपल्या देशात प्रत्येक राज्यातील नृत्यप्रकार हा त्या त्या भागातील संस्कृती, परंपरा यांचे दर्शन घडवीत असतो. पुण्याजवळील फुलगाव येथील ‘ईश्वरपुरम्’ संस्थेत वास्तव्यास असलेल्या नागालँडमधील नागा विद्यार्थ्यांनी नुकतेच आपल्या पारंपारिक बांबू नृत्याचे दर्शन पुणेकरांना घडविले. निमीत्त होते स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सुरु असलेल्या ३६ व्या पुणे फेस्टिव्हलचे. यावेळी संस्थेच्या ३७ विद्यार्थ्यांनी नागालँड मधील नागा आदिवासी बांबू नृत्य सादर केले. शुभांगी मेहता आणि ३७ नागा कलाकार यांनी या नृत्याचे सादरीकरण केले.

२००२ साली कै. भय्याजी काणे यांच्या कामातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यकर्ते कै. विकास भागवत यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांबरोबर ‘ईश्वरपुरम्’ या संस्थेची स्थापना केली. भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांना मूळभूमी भारताशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्यासाठी अगदी लहान वयातच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्यात आणण्याचा विचार करून या संस्थेची स्थापना करण्यात आली.

नगर रस्त्यावरील फुलगांव येथील स्थानिक शेतकरी असलेले तानाजी खेसे यांनी आपली पत्नी कै. लक्ष्मीबाई खेसे यांचे स्मरणार्थ दोन एकर जागा संस्थेला दान केली आणि नागालँडचे माजी राज्यपाल कै. पद्मनाभजी आचार्य यांच्या सहकार्यातून आज नागालँड येथील २० तर अरूणाचल प्रदेश येथील २० विद्यार्थी या वसतीगृहात राहतात व शेजारी असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी साळा व लोकसेवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देखील घेतात.

फुटबॉल या खेळात प्राविण्य असलेले हे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या शाळेला यश मिळवून देत आहेत हे विशेष. पुणेकरांच्या प्रेमातून आणि आर्थिक सहकार्यातून शिक्षण घेणारे विविध जनजातींमधील या विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपारिक नृत्याचे सादरीकरण करीत राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण पुणे फेस्टिव्हलमध्ये सर्वांसमोर ठेवले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading