गणेशोत्सवातील मिरवणुका पर्यावरणपूरक आणि डीजेविरहित करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे – ‘पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा दीर्घ आहे, वैभवशाली आहे. काळाच्या ओघात या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. मात्र, आता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत आपण सगळ्यांनी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला पाहिजे आणि मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करत, डिजेविरहित मिरवणुका काढल्या पाहिजेत’, असे आग्रही प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केले.
३६व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. मनोरंजनासह कलात्मक आनंद देणार्या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी उद्घाटन सोहळ्याचे स्वरूप अधिक दिमाखदार झाले. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात विधानपरिषद काँग्रेस गटनेते सतेज पाटील, पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार सुनेत्रा पवार, पुण्याचे आयुक्त राजेंद्र भोसले, पर्यटन उपसंचालक शमा पवार, उल्हासदादा पवार, क्रुष्णकुमार गोयल ,अँड .अभय छाजेड ,डॉ. सतीश देसाई, आमदार रवींद्र धंगेकर, मेरी फ्रान्स अलंस,डॉ. भाग्यश्री पाटील या प्रसंगी म्हणून उपस्थित होते.
पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचलनालय आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. याप्रसंगी विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नामवंतांना ‘जीवनगौरव पुरस्कार’, तसेच ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांना अजित पवार यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. तसेच ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि पर्यटनस्थळ बनलेल्या मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे देवराम गोर्डे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन सन्मानाने गौरविण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील मंडळांचा पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘जय गणेश पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. यंदा गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅरा आलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळवणार्या सचिन खिलारी यांचाही गौरव करण्यात आला.
अजित पवार पुढे म्हणाले, ‘पुणे फेस्टिव्हलने दिमाखदार अशी ३५ वर्षे पूर्ण केली आहेत, याचे श्रेय सुरेश कलमाडी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे यांचे आहे. पुणे फेस्टिव्हल कलमाडी यांनी जागतिक स्तरावर नेला. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकार, मान्यवर व्यक्ती, पाहुणे, पर्यटक, राजकीय दूतावासातील अधिकारी तसेच अनेक सेलिब्रिटी मंडळी कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर आणली. अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करून रसिकांना त्यांच्या कलेचा आविष्कार घडवला. तसेच युवा कलाकारांना व्यासपीठ दिले. महिलांसाठी स्वतंत्र उपक्रम केले. विधायक कार्य करणार्या मंडळांचा आणि समाजासाठी योगदान देणार्या मान्यवरांचा विशेष गौरव केला. त्यांच्या या कार्याचे उत्तरदायित्व आता कृष्णकुमार गोयल, अड. अभय छाजेड आणि त्यांच्या चमूचे आहे. ही सारी मंडळी पुणे फेस्टिव्हलला पुन्हा एकदा पूर्वीचा दिमाख आणि वैभव प्राप्त करून देतील. गणेशोत्सव हा आनंदाचा, उर्जेचा आणि चैतन्याचा उत्सव आहे, याचे भान ठेवून सामाजिक सलोखा, सौहार्द जपा. कुठलीही तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. लोकमान्यांनी ज्या भावनेने या उत्सवाला सामाजिक रूप दिले, तो उद्देश ध्यानात ठेवा आणि उत्सवाचा आनंद घ्या’.
सतेज पाटील यांनी पुणे फेस्टिव्हलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘मी इथे प्रेक्षक म्हणून येत असे, आज विशेष अतिथी म्हणून आलो, याचा आनंद आहे. कलमाडी आणि त्यांच्या सहकारायांनी हा फेस्टिव्हल आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला तसेच या उत्सवाने सामाजिक बांधीलकीचा संदेश जपला आहे’, असे पाटील म्हणाले.
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत मांडताना शि. द. फडणीस यांनी आयोजकांचे आभान मानले. शंभराव्या वर्षीही मी कसा ताडताड चालू शकतो, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी करून दाखवले तेव्हा रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘या पुरस्काराने जबाबदारी वाढल्याची जाणीव झाली आहे. या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते एकत्र येतात, हे मला महत्त्वाचे वाटते. नामवंत कलाकार, साहित्य-कला यांच्या आविष्काराने इथे सांस्कृतिक उर्जा तयार होते. गणेशोत्सव ही आताच्या काळातही लोकचळवळ बनली आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र फेस्टिव्हलने जपला आहे. विविधतेतील एकतेचा हा मंत्र सार्यांनी जपावा’.
नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्याने पारणे फिटले
पुणे फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे नेत्रदीपक मनोरंजक सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. सुरुवातीला ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर व त्यांच्या सहकार्यांनी सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. दीपप्रज्वलन व श्री गणेश आरती मान्यवरांच्या हस्ते झाली. ज्येष्ठ नृत्यगुरू विदुषी पंडिता कै. रोहिणी भाटे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांनीच ३० वर्षांपूर्वी पुणे फेस्टिव्हलमध्ये कथ्थक व भरतनाट्यम् यांचा विलोभनीय मिलाफ असणाऱ्या ‘पंचारती’ या नृत्याविष्काराची निर्मिती करून तो अविस्मरणीय कार्यक्रम सादर केला होता. त्यांची ही स्मृती जागती ठेवण्यासाठी ‘नादरूप’ संस्थेच्या १४ ते १८ कलाकार विद्यार्थिनींनी ‘सेतू’ हा कथ्थक व भरतनाट्यमचा मिलाफ असणाऱ्या नव्या स्वरूपातील नृत्याविष्कारातून गणेशवंदना सादर करून नृत्यगुरू कै. रोहिणी भाटे यांना आदरांजली अर्पण केली.
महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांवर आधारित नृत्य ३० युवक-युवती कलावंतांनी सादर केले. संबळवादक गौरी वनारसे आणि राजेंद्र बडगे ग्रुपच्या कलाकारांनी संबळवादन पेश केले. त्यावर नृत्यदिग्दर्शिका नृत्यांगना वृंदा साठे आणि कलाकारांनी देवी आणि दैत्य यांच्यातील युद्धप्रसंग आविष्कृत केला. सादरीकरण व संकल्पना करुणा पाटील यांची तर मिडास टच इन्स्टिट्यूटच्या डॉ. अंजली जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले होते.
गुजराती लोकनृत्य ‘डांग’, गुजराती आदिवासी नृत्य, ‘भवई’ हे राजस्थान आणि गुजरात सीमेवरील लोकनृत्य यांच्या मिश्रणातून ‘डाकला’ या पारंपरिक गुजराती संगीतावर आधारित गरबा नृत्य ‘झांकी ग्रुप ऑफ गरबा अँड फोक’या संस्थेच्या १२ कलावंतांनी ‘डाकला’ नृत्य सादर केले.
ईशान्य भारतातील नागालँडचे विद्यार्थी पुण्याजवळील फुलगाव येथील ‘ईश्वरपुरम’ संस्थेत शिकत आहेत. नागा जमातीचे वैशिष्ट्य असणारा पारंपरिक ‘बांबू डान्स’ हा आदिवासी नृत्याविष्कार ३७ नागा विद्यार्थ्यांनी सादर करीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.
गेली ३० वर्षे जम्मू-काश्मीर, आसाम इत्यादी भागांतील विद्यार्थ्यांना पुण्यात मोफत निवास, भोजन व शिक्षण देणाऱ्या ‘सरहद’ या संस्थेच्या वाटचालीवर आधारित ‘द ग्लोरी ऑफ सरहद’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात आसाम, मणिपूर व महाराष्ट्रातील ‘सरहद’मधील ३० विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिकणारे २१ देशांमधील २५ विद्यार्थ्यांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा आंतरराष्ट्रीय सलोख्याचा संदेश देणारा अविस्मरणीय नृत्याविष्कार सादर केला.
या उद्घाटन सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या लावणीच्या ‘ऱ्हिदम ऑफ लावणी’ कार्यक्रमाने झाली. शर्वरी जमेनीस, दिपाली सय्यद, प्राजक्ता गायकवाड आणि वैष्णवी पाटील या अभिनेत्री नृत्यांगनांनी सहकाऱ्यांसह लावणी सादर केली. निकिता मोघेज् पायलवृंद संस्था आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या डान्स आणि कोरिओग्राफी विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
