Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी खरोखरच न्याय मिळणार का ? – संजय राऊत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांच्या निवासस्थानी दिलेली भेट आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत दाखल याचिकेच्या सुनावणीला होणारा विलंब, याची सांगड घालत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खुद्द सरन्यायाधीशांवरच शंका व्यक्त केली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी खरोखरच न्याय मिळणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन गणेशोत्सवानिमित्त गौरी आणि गणेशाचे दर्शन घेतले. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात पंतप्रधानांनी धार्मिक कार्यक्रमासाठी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी जाणे हे संविधान आणि राजशिष्टाचाराला धरून आहे काय, असा सवालही राऊत यांनी केला.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. मात्र, त्यासाठी तारखांवर तारखा पडत आहेत. त्यामुळे या प्करणी आम्हाला न्याय मिळणार का, अशी शंका वाटू लागली आहे. सरन्यायाधीश पदावर चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती असतानाही न्याय मिळण्यास विलंब का होत आहे? खुद्द सरन्यायाधीशांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारला घटनाबाह्य सरकार म्हटले आहे. मग प्रत्यक्ष निर्णय होण्यास एवढा कालावधी का लागतो? पंतप्रधानांची सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी भेट आणि त्यांच्यातील राजकीय जवळीक पाहता यामागे काही वेगळी कारणे आहेत का, अशी शंका घेण्यास वाव आहे, असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकार वाचवण्यासाठी महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना खतम करायचे. त्यासाठी न्यायालयांची मदत घ्यायची, असा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याच्या शंका अधोरेखित झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading