मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचे निधन
नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचे आज दुपारी एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने देशभरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
येचुरी यांना एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट संसर्ग झाल्यामुळे १९ ऑगस्ट रोजी उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
येचुरी यांचा जन्म चेन्नई येथे तेलुगु भाषिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील आंध्र प्रदेश परिवहन विभागात अभियंता होते तर त्यांच्या आई शासकीय अधिकारी होत्या. केंद्रीय बोर्डात दहावीच्या परीक्षेत देशात सर्वप्रथम आलेल्या येचुरी यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकत असताना त्यांनी तब्बल तीन वेळा विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद भूषविले. याच काळात त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. आणीबाणीच्या काळात अटक झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये येचुरी यांचाही समावेश होता.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस हरकिशनसिंग सुरजीत यांच्या नेतृत्वाखाली येचुरी यांनी पक्षातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्याबरोबर सन १९९६ मध्ये संयुक्त आघाडी सरकार स्थापनेसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य येचुरी यांनी केले. त्याचप्रमाणे सन २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकार स्थापनेसाठी विरोधकांची मोट एकत्र बांधण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि प बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी येचुरी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
