राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा वादाच्या भोवऱ्यात
नवी दिल्ली: वृत्तसंस्था
आपल्या तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील भारतविरोधी खासदार इल्हान उमर यांची भेट घेतल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून त्यांना टीकेचे लक्ष केले जात आहे.
अमेरिकन संसदेतील खासदार इल्हान उमर या भारत विरोधी म्हणून ओळखल्या जातात. आफ्रिकेतून अमेरिकेत शरणार्थी म्हणून आलेल्या आणि अमेरिकन संसदेत पोहोचलेल्या दोन मुस्लिम महिला खासदारांपैकी त्या एक आहेत. त्यांच्याकडून वारंवार स्वतंत्र काश्मीर आणि खलिस्तानची मागणी केली जाते. काही वर्षांपूर्वी त्यांनी पाक व्याप्त काश्मीरला भेट दिली होती. हा दौरा पाकिस्तान पुरस्कृत असल्याचे सांगितले जाते.
भारताचा विरोध करणाऱ्या, भारताच्या विरोधात अभियान चालवणाऱ्या खासदारांना भेटून राहुल गांधी यांनी राष्ट्रद्रोही पाऊल उचलले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांनी केला आहे.
काँग्रेस आता उघडपणे देश विरोधी कृत्य करायला लागली असल्याचा आरोप करून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर कठोर टीका केली. राहुल गांधी यांच्यासाठी पाकिस्तानातून आंबे तर चीनमधून राजीव गांधी फाउंडेशनमध्ये पैसे येत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत विरोधी सर्व देश आणि इतर देशातील भारत विरोधी लोकप्रतिनिधी यांच्याशी राहुल गांधी यांचे सख्य असल्याचा आरोपही त्यांनी केला.
