मणिपूर प्रकरणी मोदी – शहा यांनी राजीनामा द्यावा – संजय राऊत
मुंबई: मणिपूर हा देशाच्या काळजाचा तुकडा आहे. तिथली परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया, युक्रेनचे युद्ध थांबविण्याचे प्रयत्न करण्यापूर्वी मणिपूरला जावे. तिथे शांतता प्रस्थापित करावी. अथवा अपयश पत्करून पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मणिपूर दीड वर्षापेक्षा अधिक काळ पेटलेले आहे. तिथे गोळीबार, बॉम्ब हल्ले होत आहेत. रॉकेट आणि ड्रोन हल्ले होत आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांना मणिपूरकडे लक्ष देण्यास वेळ नाही. रशिया आणि युक्रेनचा दौरा करणाऱ्या पंतप्रधानांना मणिपूर ला भेट द्यायला वेळ नाही, असा आरोप राऊत यांनी केला.
गृहमंत्री अमित शहा मुंबईला येतात. राजकीय बैठका घेतात. मात्र, त्यांनाही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात रस नाही, अशी टीका करून राऊत म्हणाले की, मणिपूरचा दोष माथी मारायला आता पंडित नेहरू नाहीत. अकरा वर्षे सत्ता तुमची आहे. मणिपूर शांत करण्याची जबाबदारी तुमची आहे. मणिपूर हातातून घालवायचा आहे का, असा सवालही त्यांनी केला.
