Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

किरीट सोमय्या यांचा चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांना घरचा आहेर

मुंबई: लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराज असलेल्या किरीट सोमैय्या यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून काम करण्यास नकार दिला आहे. त्याचप्रमाणे आधी विचारणा न करता परस्पर या पदावर नियुक्ती जाहीर केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आपल्याच पक्षातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांना घरचा आहेर दिला आहे. 

सन 2014 मध्ये सोमैय्या यांनी ईशान्य मुंबई मतदार संघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर झालेल्या सन 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी झाल्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी सोमैय्या यांची अपेक्षा होती. मात्र, पक्षाकडून त्यांना डावलून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सोमैय्या हे पक्षावर नाराज आहेत. 

आपण पक्षाचे निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून माझी नियुक्ती केल्याची परस्पर घोषणा केली. याबाबत माझ्याकडे विचारणा केली नाही किंवा पूर्वकल्पना दिली नाही. ही पद्धत योग्य नाही. या पदासाठी नियुक्ती केल्याने मी पक्षाचे आभार मानतो. मात्र, ही जबाबदारी स्वीकारण्याची माझी तयारी नाही, या पुढील काळात विचारणा न करता अथवा पूर्वकल्पना न देता परस्पर नियुक्ती करून अवमानास्पद वागणूक दिली जाऊ नये, अशा आशयाचे पत्र सोमैय्या यांनी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असलेले रावसाहेब दानवे यांना पाठवले आहे. त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पाठवली आहे. सन 2019 पासून आपण पक्षाचा सामान्य सदस्य म्हणून काम करत असून सामान्य सदस्य म्हणूनच आपल्याला काम करू द्यावे, अशी विनंती ही त्यांनी केली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading