Saturday, June 13, 2026
Latest NewsNATIONAL

रशिया आणि युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेचे रशियाने केले कौतुक

मॉस्को (वृत्तसंस्था) : रशिया युक्रेन युद्धात युक्रेनला शस्त्र पुरवठा करून आगीत तेल ओतण्याचे काम अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनी थांबवले नाही तर जागतिक शांततेला धोका निर्माण होईल, असा इशारा रशियाने अमेरिका आणि पाश्चात्य देशांना दिला आहे. त्याचवेळी भारतासह चीन आणि ब्राझील हे देश युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल रशियाने त्यांचे कौतुकही केले आहे.

सुमारे दोन वर्षापासून रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू झाले तेव्हा केवळ आठ ते पंधरा दिवसात रशिया युक्रेनला गिळंकृत करेल, असे मानले जात होते. मात्र, अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि आर्थिक रसद पुरविली. त्यामुळे युक्रेने केवळ तगच धरली नाही तर काही काळापूर्वी त्यांनी रशियाच्या भूप्रदेशावर आक्रमण करून कुर्स्क शहर ताब्यात घेतले. मागील काही काळापासून युक्रेन अधिक आक्रमक झाला असून या युद्धात रशियाचे अपरिमित नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर युक्रेनला सहकार्य करणाऱ्या अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांवर रशियाने आगपाखड केली आहे. युक्रेनला शस्त्र परवठा करण्याबाबतची मर्यादा अमेरिकेने केव्हाच ओलांडली आहे. त्यामुळे आम्ही अमेरिकेसंदर्भात पाळलेल्या संयमाची परीक्षा बघितली जात आहे. अमेरिकेने हेच उद्योग सुरू ठेवले तर त्याचे परिणाम केवळ अमेरिकेला अथवा पाश्चात्य देशांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला भोगावे लागतील. अमेरिकेच्या या कृत्यांमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल, असे रशियाने नमूद केले आहे.

तिसऱ्या वेळ भारताच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा करून राष्ट्र प्रमुख व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे काही काळापूर्वी त्यांनी युक्रेनला भेट देऊन तेथील राष्ट्रप्रमुख व्लादिमीर झेलेंस्की यांच्याशी संवाद साधला. कोणत्याही समस्येतून तोडगा काढण्यासाठी युद्धाचा मार्ग उपयोगी ठरत नाही. त्यासाठी संवादाची गरज आहे, हे त्यांनी दोन्ही राष्ट्र प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिले. भारताच्या या प्रयत्नांचे रशियाने कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे चीन आणि ब्राझील या देशांनाही हे युद्ध संपुष्टात यावे, असे वाटत असून आपण या सहकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहोत, असेही रशियाने स्पष्ट केले आहे.

दीर्घकाळ लांबलेल्या या युद्धामुळे रशियाचे मोठे नुकसान झाले असले तरीही त्याहीपेक्षा अधिक मोठी किंमत देश म्हणून युक्रेनला मोजावी लागली आहे. या युद्धामुळे सुरुवातीला झेलेंस्की यांच्या पाठीशी असलेली युक्रेनची जनता आता युद्धाला कंटाळली आहे. एकीकडे नागरिक युद्धामुळे हाल अपेष्टा सहन करत असताना झेलेंस्की अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर डोळा ठेवून युद्ध लांबवत असल्याची भावना नागरिकांमध्ये घर करू लागली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडल्यानंतर त्या पदावर डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर युक्रेनला मिळणारी मदत बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन या निवडणुकीपूर्वी जेवढे मिळेल ते पदरात पाडून घ्यावे, या हेतूनेच झेलेनस्की यांनी सध्या अधिक आक्रमक भूमिका घेतली असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading