Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

नरेंद्र मोदी यांनी केवळ महाराजांची माफी मागणे पुरेसे नाही – राहुल गांधी

सांगली:  मालवणच्या राजकोट किल्ल्यात केवळ आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ महाराजांची माफी मागणे पुरेसे नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जणांची माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. 

काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला धारेवर धरले. पंतप्रधानांनी कशा कशाची माफी मागितली पाहिजे, याची यादीच त्यांनी मांडून दाखवली. 

मोदी यांनी नेमकी कशाबद्दल माफी मागितली, हे स्पष्ट झालेले नाही. ज्याच्या हातून चूक होते तोच माफी मागत असतो. कदाचित शिवछत्रपतींची मूर्ती घडविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्तीला दिले. ते गुणवत्ता असलेल्या सक्षम शिल्पकाराला द्यायला हवे होते, या जाणिवेतून मोदी यांनी माफी मागितली असेल. दुसरे कारण म्हणजे या पुतळा उभारणीच्या कामात भ्रष्टाचार किंवा चोऱ्यामाऱ्या झाल्याचे त्यांच्या लक्षात आले असेल किंवा शिवछत्रपतींचा पुतळा उभारल्यानंतर आठ महिने देखील उभा राहू शकला नाही, हे त्यांच्या माफी मागण्याचे तिसरे कारण असू शकेल, असे राहुल गांधी म्हणाले.

पतंगराव कदम यांच्या कार्याचा गौरव

तुम्ही उभा केलेला पतंगराव कदम यांचा पुतळा मात्र, दीर्घकाळ उभा राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच राहुल गांधी यांनी कदम यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कदम यांनी कायम महाराष्ट्राचा विचार केला. राज्याचा विकास केला आणि शिक्षण क्षेत्रात सेवा केली. ते आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यानंतर सुद्धा कदम हे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले, असे गांधी यांनी नमूद केले. 

… या कारणांसाठी ही मागा देशाची माफी

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक चुका केल्या. नोटबंदीचा निर्णय चुकीचा निर्णय होता. वस्तू व सेवा कर ज्या पद्धतीने आणला ती पद्धतही चुकीची होती. अशा सगळ्या चुकांबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी केली. हे सरकार केवळ दोन लोकांसाठी चालले आहे. कोणतेही मोठे काम हे केवळ अंबानी किंवा अदानी यांनाच मिळते, असा आरोपही त्यांनी केला. 

महाराष्ट्रातील महापुरुषांनी दिली देशाला प्रेरणा 

महाराष्ट्र हे विकसित राज्य आहे. या राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार दिला. या महापुरुषांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली, अशा शब्दात राहुल गांधी यांनी या महापुरुषांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. 

शिवछत्रपतींचा विचार तोच आमचा विचार 

शिवछत्रपतींनी जी विचारसरणी रुजवली तीच आमची विचारसरणी आहे. आमच्या नसानसात विचारसरणी आहे. सध्या दोन विचारसरणीमध्ये युद्ध सुरू आहे. एका बाजूला महापुरुषांचे विचार आहेत तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे. आम्हाला सर्वांना घेऊन पुढे जायचे आहे तर त्यांना निवडक लोकांनाच फायदे लुटू द्यायचे आहेत, मागासांनी मागासच रहावे, दलितांनी दलितच राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना त्यांची माणसं बसवायची आहेत, अशी टीकाही गांधी यांनी केली. 

भाजपचे राजकारण विद्वेषाचे 

भाजपचे राजकारण हे विद्वेषाचे राजकारण आहे. भाजप धर्माधर्मांमध्ये, जाती जातींमध्ये, प्रांता प्रांतांमध्ये विद्वेष निर्माण करीत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. तब्बल दीड वर्षापासून मणिपूर पेटलेले आहे. मात्र, पंतप्रधान त्या ठिकाणी गेले नाहीत. कारण ती आग भाजपच्या लोकांनीच लावलेली आहे, असेही ते म्हणाले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading