वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेने ठाकरे गटाला पाडले खिंडार
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे. ठाकरे गटातील अनेक नेते व शिवसैनिक यांच्यासह आतापर्यंत राजकारणापासून दूर असलेले सामाजिक कार्यकर्तेही मनसेत दाखल झाले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळीतील अनेक शिवसैनिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला. ठाकरे गटाचे उपनेते मनोज जामसुतकर यांचे निकवर्तीय अमित मटकर आणि हरीश जावळेकर यांनी देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते आणि वरळीतील नागरिक यांनी देखील मनसेत प्रवेश केला आहे.
आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी नसलेल्या मात्र, सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास व्यक्त केल्यामुळे त्यांना देखील पक्षात प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस आणि वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात रिंगणात उतरणारे उमेदवार संदीप कुलकर्णी यांनी दिली.
या विधानसभा निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. राज ठाकरे यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी उमेदवारांची चाचपणी केली आहे. काही ठिकाणचे उमेदवार देखील ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यात जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला, पर्याय आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेची या निवडणुकीत मात्र कोणाशीही युती, आघाडी नसेल. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
