भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत एकशे पंचवीस जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी
मुंबई: विधानसभा निवडणुकीत दीडशे जागांचा आग्रह धरणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेत्यांनी अखेर सव्वाशे जागांवर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत एकशे पंचवीस जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी व्यक्त करण्यात आले. यापैकी २५ जागांवर आपला उमेदवार निश्चित निवडून येईल, अशी भाजप नेत्यांना खात्री आहे. उर्वरित ७५ जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या ७५ जागांसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. त्यानुसार या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, पक्षाची बलस्थाने आणि उणीवा यांचा आढावा प्रदेश पातळीवरील नेते घेणार असून त्याबद्दलचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला सादर केला जाणार आहे.
या मतदारसंघाच्या जिल्हा स्तरावरील नेत्यांकडे मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचून संपर्क प्रस्थापित करावा, अशी अपेक्षा आहे. प्रचार मोहिमेदरम्यान प्रचाराच्या कामांचा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार असून त्याचा अहवाल ही केंद्रीय नेतृत्वाला सादर केला जाणार आहे.
