Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा खोडा

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षातील कोणत्याही नेत्याचे नाव निश्चित करा. मात्र, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा, असा शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे. काँग्रेसला (congress)  ही भूमिका अजिबात मान्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाने याबाबत कोणतेही भाष्य केले नसले तरीही ही भूमिका मान्य नसल्याचे अनुल्लेखातून स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत मतदारांसमोर जाताना मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा समोर आणावा, अशी मागणी ठाकरे आणि त्यांचे खासदार संजय राऊत सातत्याने करीत आहेत. काही काळापूर्वी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीचा दौरा करून विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे कालांतराने स्पष्ट होत आहे.

नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. पटोले यांनी त्याला जाहीरपणे नकार दिला तर शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही उल्लेख करण्याचे टाळून ठाकरे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

पत्रकारांची अनौपचारिक संवाद साधताना देखील ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. ज्या पक्षाचे अधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरवले गेल्यास एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे काम केले जाते. युतीच्या काळात असे प्रकार घडले आहेत, असा दावाही ठाकरे यांनी केला होता.

पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. महाराष्ट्रात जो पक्ष विरोधात बसला असेल तो पक्ष निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची परंपरा नाही. युती किंवा आघाडीत ज्या पक्षाचे अधिक उमेदवार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, ही बाब निर्विवाद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading