Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

योजनेला खोडा घालणाऱ्या भावांना योग्य वेळी जोडा दाखवा – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ

पुणे : राज्यातील माता-भगिनींना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणण्यात आली आहे. मात्र, या योजनेच्या सुरुवातीपासूनच सावत्र भावांनी त्यावर टीका केली आहे. अशा खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना योग्य वेळ आली की जोडा दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भगिनींना केले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते उपस्थित होते.

आपल्या सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा करताच विरोधात बसलेल्या सावत्र भावांनी विकत घेता का, भीक देता का, लाच देता का, अशा शब्दात टीका करण्यास सुरुवात केली. बहिणींबाबत असे उद्गार काढण्यास यांना लाजही वाटली नाही. योजनेला खोडा घालण्यासाठी ते न्यायालयातही गेले. मात्र, न्यायालयाने बहिणींच्या बाजूने निकाल दिला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दीडचे तीन हजारही होतील 

लाडकी बहिणी योजनेअंतर्गत बहिणींना सध्या दीड हजार रुपये दिले जात आहेत. उद्या सरकारचे बळ वाढले तर दीडचे दोन हजार होतील. दोन त अडीच आणि अडीचशे तीन हजारही होतील. सरकारची क्षमता वाढली तर या योजनेत भगिनींना मिळणारी रक्कम देखील वाढेल. सरकारचे बळ वाढवणे तुमच्या हातात आहे. सरकार तुमचे आहे. देण्याची क्षमता असली तरी त्यासाठी नियत लागते. दानत लागते. आपले सरकार दानत असलेले सरकार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. या मुदतीपर्यंत ज्या भगिनी अर्ज करतील त्यांना मुदतीनंतर  जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीनही महिन्यांचा निधी त्यांच्या खात्यात निश्चितपणे जमा केला जाईल, ज्या भगिनींचे आधार कार्ड लिंक नसेल, त्यांच्याही खात्यात रक्कम येईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भगिनींना दिलासा दिला.

… यांना दीड हजाराचे महत्त्व काय कळणार? 

‘हम दो हमारे दो,’ वाल्यांना दीड हजार रुपयांचे महत्त्व काय कळणार? मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. गरिबचे चटके मी बघितले आहेत. संसारात माझ्या आईची होणारी ओढाताण मी बघितली आहे. वडील किती अडचणींना तोंड देऊन संसाराच गाडा चालवीत होते, ते मी बघितले आहे. आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही. त्यामुळे दीड हजाराची किंमत आम्हाला कळते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading