Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पर्यावरणपूरक महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  :- ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचे असल्याने  यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे. आपल्या सर्वांच्या योगदानातून आपल्याला पर्यावरणपूरक महाराष्ट्र करावयाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

‘सेव्ह मुंबई’ (Save Mumbai) कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा व ‘द ॲड्रेस  सोसायटी’च्या वतीने अडीच एकर क्षेत्रफळावरील मानवनिर्मित जंगलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते  बोलत होते. कार्यक्रमास कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह द ॲड्रेस  सोसायटीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वातंत्र्य दिनी घाटकोपर येथील द ॲड्रेस हाऊसिंग सोसायटीने त्यांच्या सोसायटीच्या  परिसरात अर्बन फॉरेस्ट निर्माण करून पर्यावरण रक्षणात केलेले काम अतुलनीय आहे. या सोसायटीचा आदर्श मुंबईतील अन्य सोसायट्यांनी घ्यावा. मुंबईत ज्या सोसायटी त्यांच्या परिसरात अर्बन फॉरेस्ट हा उपक्रम राबवतील, त्यांना  महापालिकेच्या सोसायटी करामध्ये सवलत देण्याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान सुरू केले आहे. या अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन आपण सर्वांनी राज्यात वृक्ष लागवडीची जनचळवळ सुरू करूया. अर्बन फॉरेस्ट ऑक्सिजन पार्क असल्याने जिथे जागा मिळेल तिथे वृक्ष लागवड करून अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. यासाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. बृहन्मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएनेही त्यांच्या रिकाम्या असणाऱ्या जागेत अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. प्रदूषणमुक्त  राज्य करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. राज्यात बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत असून जवळपास २१ लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवले असल्याचे ते म्हणाले.

आपले राज्य विकासाच्या सर्व क्षेत्रांत आघाडीवर असून विकासाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरू ठेवायची असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading