Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

चिथावणीला बळी पडू नका. राज्यात शांतता राखण्यासाठी सहकार्य करा – प्रकाश आंबेडकर

नांदेड: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि इतर मागासवर्गीय यांच्या तणाव निर्माण झालेला असताना त्याचा गैरफायदा घेऊन काहीजण दंगली भडकावण्यासाठी चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील. अशा चिथावणीला बळी पडू नका. राज्यात शांतता राखण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या घटकांच्या सगे सोयाऱ्यानाही आरक्षणात सामावून घ्या, अशा मराठा आरक्षण आंदोलकांच्या आग्रही मागणी आहे. मात्र, या मागण्या मान्य झाल्यास इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षणात कोणताच वाटा मिळणार नाही, अशा धास्तीने हा समाजही आरक्षण बचाव ही भूमिका घेऊन रस्त्यावर उतरला आहे. या वादात ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याची भूमिका घेऊन आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे.

या दोन्ही आंदोलनामुळे गावागावात मराठा समाज आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्यात दुफळी निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दोन्ही समाजातील तरुणांना भडकवून दंगली घडवून आणण्याची शक्यता आहे. मात्र, अशावेळी कोणी दंगल करण्यास सांगत असेल तर त्यांना आधी तुम्ही आपल्या मुलांना दंगल करण्यासाठी पाठवा, असे प्रत्युत्तर द्या, असेही आंबेडकर म्हणाले.

आरक्षण देण्याचे काम सरकार करणार असले तरीही सरकारने दिलेले आरक्षण कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे की अयोग्य हे ठरवणचे काम न्यायालय करणार आहे. त्यामुळे दंगली घडविण्यासारख्या भानगडी कडून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका, असेही आंबेडकर यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही यात्रा यशस्वी झाल्याचे दाखवून द्या, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading