Sunday, June 7, 2026
BLOGLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

लाडक्या बहिणीला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळणार मोफत; राज्य सरकारची घोषणा

मुंबई : राज्यातील महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, गरीब महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच पर्यावरणाची हानी टाळणे याबाबींचा विचार करुन राज्य शासनाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेचा १ जुलै २०२४ पासून प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांची पात्रता: योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता पात्र ठरणारे लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे. शिधा पत्रिकेनुसार एका कुटुंबातील केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे. सदरचा लाभ केवळ १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ १ जुलै २०२४ रोजी पासून देण्यात येणार असून त्यानंतर विभक्त करण्यात आलेल्या शिधापत्रिकातील कुटुंबास लाभ मिळणार नाही.

योजनेची कार्यपद्धती- मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या ३ मोफत सिलेंडरचे तेल कंपन्यांमार्फत वितरण करण्यात येणार आहेत. सद्यःस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या धर्तीवर अंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी ८३० रुपये असून ती ग्राहकांकडून घेतली जाते. त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारी ३०० रुपयाचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे ५३० रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करायची आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी, तहसिल कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नजीकच्या रास्तभाव दुकान, गॅस वितरण केंद्राशी संपर्क साधावा.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading