Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भारतीय जनता पक्षात प्रवेश करा अथवा तुरुंगात जा, हेच देवेंद्र फडणवीस यांचे धोरण – अनिल देशमुख

नागपूर:  भारतीय जनता पक्षात प्रवेश करा अथवा तुरुंगात जा, हेच देवेंद्र फडणवीस यांचे धोरण आहे, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर आरोप करा, असा निरोप फडणवीस यांनी आपल्याकडे पाठवला होता, असा दावाही देशमुख यांनी केला. 

… तर ठाकरे सरकार आधीच पडले असते

आपल्यावर सक्तवसुली संचालनालयाची कारवाई होण्यापूर्वी फडणवीस यांनी मिरज येथील भाजप कार्यकर्ता समित कदम याच्यामार्फत आपल्याकडे निरोप पाठवला. त्यानुसार त्यांनी आपल्याला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर आरोप करण्यास सांगितले. आपल्यावरचा हा प्रयोग फसला. अन्यथा तीन वर्षांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले असते. त्यानंतर फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेला प्रयोग यशस्वी झाला आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले. त्यानंतर अजित पवार यांच्यावर केलेला प्रयोगही सफल झाला, असे देशमुख यांनी नमूद केले. 

विरोधकांबरोबर त्यांच्या मुलांनाही अडकविण्याचा डाव 

फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणे समजू शकते. ते फडणवीस यांचे राजकीय विरोधक, प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, कोणताही संबंध नसताना आदित्य ठाकरे यांनाही अडकवण्याचा डाव फडणवीस यांनी रचला होता. विरोधकांबरोबर त्यांच्या मुलाबाळांनाहा घाणेरड्या राजकारणात अडकविण्याची कट कारस्थाने फडणवीस यांनी केली, असा आरोप देशमुख यांनी केला. फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे आपण प्रतिज्ञापत्र करून दिले असते तर अजित पवार, उद्धव आणि आदित्य ठाकरे चांगलेच अडचणीत आले असतील, असा दावाही देशमुख यांनी केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading