Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

गुरुजनांचे संस्कार, क्रीडा नैपुण्य आणि उत्तम सहकारी, यातून कार्याची प्रेरणा – सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश शेठ 

पुणे : ‘गुरुजनांचे संस्कार, खो खो क्रिडेतील नैपुण्य आणि उत्तम सहकारी, यांच्या पाठबळावर मी सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उतरलो. त्यामागे अनेकांची प्रेरणा आहे, असे कृतज्ञ उद्गार ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज, क्रीडापटू आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश शेठ यांनी व्यक्त केले.

गुरुकुल प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार यावेळी डॉ. शेठ यांना प्रदान करण्यात आला.‌ तसेच ‘व्हिजन ग्राफिक्सचे अतुल वाडकर यांना श्री ‌घन:श्याम धोंड स्मृती मुद्रांजली पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, स्नेहाधारच्या विद्यार्थ्यांनी घडवलेली भेटवस्तू आणि दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर, डॉ. अशोक कामत, डॉ. प्रकाश शेठ, शेठ यांचे मित्र रमेश होनवाड, डॉ. मधुसूदन झंवर, सुरेश दिनकर उपस्थित होते. कर्वे रस्ता येथील स्वामीकृपा सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

“आजवर जे कार्य घडले त्याचे श्रेय अनेकांना आहे. शैक्षणिक प्रगतीपासून, क्रीडापटू होण्यापर्यंत आणि सामाजिक कार्यासाठी वाहून घेण्यापर्यंतचा प्रवास दीर्घ होता. सुरवातीला वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून मी स्नेहालय संस्थेशी जोडला गेलो आणि आता याच क्षेत्रात कार्यरत आहे. एड्सग्रस्त मुली, महिला, त्यांची अपत्ये तसेच दिव्यांग, अंध, मूकबधिर विद्यार्थ्यांना किमान सक्षम करणे, शक्य ते कौशल्य देणे असे काम ‘स्नेहाधार’ आणि ‘अनाम प्रेम’ या उपक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे”, असे डॉ. शेठ यांनी मनोगतात सांगितले.

अतुल वाडकर यांनी “काळानुरूप बदल स्वीकारले तरच प्रगती शक्य आहे, नवे तंत्रज्ञान आणि यंत्रे स्वीकारली पाहिजेत, असे प्रतिपादन केले. या पुरस्कारासाठी माझी निवड केली, याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत म्हणाले, “काळासोबत राहून ज्यांनी नवे तंत्रज्ञान स्वीकारले पण आपल्या जुन्या सहकार्यांनाही सोबत ठेवले, अशा मुद्रणतज्ज्ञाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. गुरुकुल प्रतिष्ठानने सुमारे एक हजार पृष्ठांचा हिंदी भाषेतील ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रकल्प पूर्ण केला आहे. उत्तरप्रदेशातील एक हजार प्रवचनकारांना ही हिंदी भाषेतील ज्ञानेश्वरी भेट म्हणून दिली जाणार आहे. त्यामुळे आपल्या संतांचे महत्त्व आणि कर्तृत्व अमराठी लोकांपर्यंत नेता येईल”, असे ते म्हणाले.

संस्थेच्या समन्वयक शुभदा वर्तक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मधुसूदन झंवर यांनी प्रकाश शेठ यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा परिचय करून दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading