Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

‘वाकळ‌’ : आयुष्यातील आठवणींचा सौंदर्यपूर्ण आकृतीबंध – डॉ. सदानंद मोरे

पुणे : कोलाज म्हणजे विविध रंगी आकार एकमेकांना जोडून तयार केली एकसंध कलाकृती. ‌‘वाकळ‌’च्या माध्यमातून लेखकाच्या आयुष्यातील आठवणींचे, घटनांचे रंगबिरंगी साहित्यरूपी कोलाजच निर्माण झाले असून हा सौंदर्यपूर्ण आकृतीबंध आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.
करम प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कथाकार सुकुमार शहा लिखित ‌‘वाकळ‌’ या वैविध्यपूर्ण लेखसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि. 14) डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहा यांच्या ज्येष्ठ भगिनी चंदाताई शहा, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, वर्षा कुलकर्णी, शुभानन चिंचकर व्यासपीठावर होते.
‌‘वाकळ‌’ या साहित्यकृतीतील भाषा अनअलंकृत, सहज आहे असे नमूद करून डॉ. मोरे म्हणाले, लेखकाच्या मांडणीमध्ये सूक्ष्म निरिक्षणशक्ती प्रकर्षाने जाणवते. तसेच सामाजिक जाणीव जागृत असणारा स्वभाव लक्षात येतो. जे दिसते, जाणवते ते प्रांजळपणे मांडले आहे. मराठी भाषा टिकविण्यात जैन साहित्यकारांचा मोठा वाटा आहे. या साहित्यिकांनी प्राकृत भाषेत मोठ्या प्रमाणावर लिखाण केले आहे. आजच्या काळातही त्यांनी मराठीचा झेंडा हाती घ्यावा, अशी अपेक्षा डॉ. मोरे यांनी केली.
भूषण कटककर म्हणाले, ‌‘वाकळ‌’ ही साहित्यकृती कुठल्या एका विषयावर आधारित नाही तर अनेक वैविध्यपूर्ण विषयांवरील जिवंतपणे केलेले लिखाण आहे.
सुकुमार शहा यांच्या जडणघडणीविषयी बोलताना चंदाताई शहा म्हणाल्या, कुटुंबामध्ये असलेली लेखनाची परंपरा आणि वडिलांकडून मिळालेली उत्तम निरिक्षणशक्ती या बरोबरच उत्तम वर्णनशैली, परिपूर्ण लेखन, सहजसोपी भाषा, सातत्य, सकारात्मकता, सहकार्य वृत्ती यामुळे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे.
लिखाणाविषयी सुकुमार शहा म्हणाले, बोली आणि गप्पांच्या फडामधून मला लिखाणाची उर्मी मिळाली. सोप्या बोलीभाषेत लिखाण केले असल्याने ते वाचकांना नक्की भावेल. पुस्तक कशा पद्धतीने साकारले याविषयी शुभानन चिंचकर यांनी माहिती दिली.
मान्यवरांचा सत्कार सुकुमार शहा यांनी केला. सुकुमार शहा यांचा सत्कार त्यांच्या भगिनी चंदाताई शहा, उषाताई मेहता व छायाताई शहा यांनी स्वत: तयार केलेली वाकळ भेट देऊन केला. कार्यक्रमाची सुरुवात सुमन शहा, रेवती शहा, अमृता शहा, आर्वी शहा व स्निती शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
करम प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती वर्षा कुलकर्णी यांनी दिली तर सुकुमार शहा आणि डॉ. मोरे यांचा परिचय वासंती वैद्य यांनी करून दिला. सूत्रसंचालन निरुपमा महाजन, प्राजक्ता पटवर्धन यांनी केले. आभार मुक्ता भुजबले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित निमंत्रितांच्या गझल संमेलनात भूषण कटककर, मिलिंद छत्रे, वर्षा कुलकर्णी, डॉ. मंदार खरे, स्वाती यादव, वैजयंती आपटे, चैतन्य कुलकर्णी, प्राजक्ता पटवर्धन यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading