Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

आई ही संस्काराची पाठशाळा : विद्याधर अनास्कर

पुणे : आई हा शब्द उच्चारल्यानंतर मनात निर्मळ विचार येतात. आई ही संस्कारांची पाठशाळा असते, तिच्या कृतीतूनच ती आपल्या अपत्यांवर संस्कार करत असते. संस्कार ही रुजवण्याची गोष्ट आहे; शिकविण्याची नाही, असे प्रतिपादन मातृभक्त, ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ, शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कार यांनी केले. सरकारानेच सगळ्या गोष्टी कराव्यात अशी समाजात वृत्ती असताना निस्वार्थ भावनेने विजय फळणीकर करीत असलेल्या कार्याचा गौरव करून महापुरुषांचे युग संपलेले नाही, अशा भावनाही व्यक्त केल्या.
आईच्या मायेने अनाथ लहान मुला-मुलींचा सांभाळ-संगोपन करणारे ‌‘आपलं घर‌’चे संस्थापक अध्यक्ष विजय फळणीकर यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी अनास्कर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी अनास्कर बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर, संचालिका प्रज्ञा महाजन व्यासपीठावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजासमोर आणण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.


आधुनिक काळातील मातांचे-पालकांचे संस्काराविषयी समुपदेशन होणे आवश्यक आहे, असे नमूद करून अनास्कर म्हणाले, संस्थेच्या उभारणीत आर्थिक शिस्त महत्वाची असते. तेही एक प्रकारचे संस्कार असतात. पुरस्काराच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या फळणीकर यांच्यासह त्यांच्या कार्याला समाजापुढे आणले गेले आहे, ही कौतुकाची बाब आहे.सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विजय फळणीकर म्हणाले, ‌‘आपलं घर‌’ची उभारणी माझ्या एकट्यामुळे झालेली नाही तर समाजाने केलेल्या मदतीतूनच संस्था वाटचाल करीत आहे. पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, पण खेदाने असे सांगावे लागते आहे की, आजच्या काळातील पालकांनी स्वत: योग्य कृती करून मुलांवर उत्तम संस्कार करणे अपेक्षित आहे. आधुनिक मातांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी तसेच आपल्या अपत्यांवर चांगल्या संस्कारांची पेरणी करावी. ‌


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन वैजयंती आपटे यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे ‌‘आई‌’ या विषयावर आयोजित कविसंमेलनात जयंत भिडे, प्रभा सोनवणे, डॉ. रेखा देशमुख, मीनाक्षी नवले, सुनिता टिल्लू, अश्विनी पिंगळे, प्रतिभा पवार, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, सीताराम नरके, अजय जोशी, सुजित कदम, सौदामिनी साने, डॉ. ज्योती रहाळकर यांचा समावेश होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading