कॉँग्रेसची राज्यातील सर्व 288 मतदारसंघातून चाचपणी
मुंबई: लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित पणे चमकदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसचे मनोबल चांगलेच वाढले असून पक्षाने राज्यातील सर्व 288 मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. त्यामुळे काँग्रेस खरोखरच या निवडणुकीत स्वबळाची परीक्षा देणार की महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर अधिक जागा मिळवण्यासाठी दबाव टाकण्याचे हे तंत्र आहे, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची महाविकास आघाडी आहे. लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नुकतेच जाहीर केले आहे., शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील वारंवार तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळेच भाजपाला रोखण्यात यश मिळाले याचा उल्लेख वारंवार करीत असतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसची वाताहात झालेली असताना देखील स्वबळाची भाषा वापरत आले आहेत. त्यामुळे त्याला कोणी फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. तरीही या निवडणुकीत सर्व मतदारसंघातील इच्छुकांकडून काँग्रेसने अर्ज मागविल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत दारुण परिस्थितीत आलेल्या काँग्रेसला महाविकास आघाडीच्या माध्यमातून यावेळी लोकसभा निवडणूक लढवताना तब्बल 13 जागा मिळाल्याने नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. काँग्रेसने एकूण 17 जागा लढविल्या होत्या. सांगलीचे विशाल पाटील बंडखोरी करून निवडून आले असले तरीही ते कट्टर काँग्रेसचे असल्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या खासदारांची संख्या 14 झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास भलताच वाढला आहे. अशावेळी मित्रपक्षांवर दबाव आणून विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा आपल्या पदरी पाडून घेण्याचा डावपेचाचा भाग म्हणून काँग्रेसने सर्वच जागांवर निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचे दर्शविण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागितले असण्याची शक्यता आहे. अन्यथा कितीही आव आणला तरीही स्वबळावर निवडणूक लढविण्यास काँग्रेस अद्याप पुरेशी सशक्त झालेली नाही हे स्पष्ट आहे.
