मला सरकारमधून मोकळे करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत
मुंबई : भाजपचा राज्यात जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचे आहे. मला सरकारमधून मोकळे करावे, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रित करायचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. एनडीएला १९ जागांवरच समाधान मानावे लागले. २०१९ च्या निवडणुकीत २२ जागांवर यश मिळवणा-या भाजपला फक्त ९ जागांवर विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही, याची कबुली दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नॅरेटिव्हसोबत ही करावी लागली. त्यामध्ये संविधान बदलणार असे नॅरेटिव्ह तयार करण्यात आले. हे नॅरेटिव्ह आम्हाला थांबवता आले नाही. त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा आम्हाला फटका बसला, सोबतच मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले.
पुढे बोलताना टे म्हणाले, भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही. समसमान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला. कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केला. काही ठिकाणी अँटीइन्कबन्सी दिसली. काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता. सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता. सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नॅरेटिव्ह तयार केले त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही.
इंडिया आघाडी तयार झाली होती, त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला देशात मिळाल्या आहेत. पण भाजप त्यांच्यापेक्षा मोठी राहिली, एनडीएचे घटकपक्ष मिळून सरकार तयार होत आहे याचा आनंद आहे.
