fbpx
Monday, May 20, 2024
Latest NewsPUNE

२५ लाख फुलांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर

पुणे : शोभिवंत फुलांची आरास… रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आभूषणे… सुवासिक फुलांनी साकारलेला दत्त महाराजांचा मुकुट… मोग-याच्या फुलांचा पोशाख आणि गुलाब, झेंडू, चाफा यांसारख्या तब्बल २५ लाख फुलांची सजावट वासंतिक पुष्पोत्सवानिमित्त लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आली. सत्तु अमावस्येला करण्यात येणारी फुलांची आरास पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी ट्रस्टचे उत्सव प्रमुख अक्षय हलवाई यांच्या कुटुंबियांतर्फे सकाळी लघुरुद्र करण्यात आला.

पुष्पोत्सवाबाबत माहिती देताना अध्यक्ष युवराज गाडवे म्हणाले, मंदिरात यंदा २५ लाख फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यामध्ये १२५ किलो मोगरा, २०० किलो झेंडू, १०० किलो गुलाब, गुलछडी, लिली फुले, ५० हजार चाफा फुले, जाई-जुई आणि पासलीच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि ५० सहका-यांनी ही आरास साकारली.

श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंभेस्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा आणि कै.लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आल्या आहेत. ही आरास दिनांक १० मे पर्यंत भाविकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading