fbpx
Monday, May 20, 2024
Latest NewsPUNE

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर-एमआरओ विभागात माजी सैनिकांना नोकरीची संधी

 

पुणे  : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हेलिकॉप्टर कॉम्प्लेक्स, बंगळुरु येथे हेलिकॉप्टर-एमआरओ विभागात नॉन-एक्झेक्युटिव्ह संवर्गात विमान तंत्रज्ञ (एअरफ्रेम) व विमान तंत्रज्ञ (इलेक्ट्रीकल) ही पदे माजी सैनिकांकडून चार वर्षाच्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

वेतनस्तर डी ६ मधील विमान तंत्रज्ञाची (एअरफ्रेम) १२ पदे व विमान तंत्रज्ञ (इलेक्ट्रीकल) ही ११ पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवाराने विमान तंत्रज्ञ (एअरफ्रेम) या पदासाठी मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष तर विमान तंत्रज्ञ (इलेक्ट्रीकल) या पदासाठी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी.

सशस्त्र दलात भरती होण्यापूर्वी मान्यताप्राप्त संस्थेची अभियांत्रिकी पदविका १० + ३ प्रणाली अंतर्गत पूर्णवेळेत पूर्ण केलेली असावी किंवा भारतीय वायुसेना, भारतीय स्थलसेना, भारतीय नौदलाद्वारे प्रदान केलेली संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका असावी. पदविका ही सशस्त्र दलात विहित प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि सशस्त्र दलांनी निर्दिष्ट केलेली आवश्यक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुरस्कृत केलेली असावी. यापेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत. निवड प्रक्रिया लेखी चाचणीद्वारे होईल. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीसाठी दावा करता येणार नाही.

निवडलेल्या उमेदवारांना वेतनस्तर डी -६ नुसार मूळ वेतन २३ हजार रूपये, इतर भत्ते ३४ हजार असे एकूण अंदाजे ५७ हजार मासिक वेतन दिले जाईल. नियमानुसार माजी सैनिक, अपंग माजी सैनिकांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना देशातील विविध ठिकाणी एमआरओ विभागाच्या अंतर्गत जोधपूर, (राजस्थान), पोरबंदर (गुजरात), रत्नागिरी (महाराष्ट्र), शिक्रा-मुंबई, कोची (केरळ), पोर्ट ब्लेअर (अंदमान आणि निकोबार), चेन्नई (तामिळनाडू), देगा विझाग आणि मिसामारी (आसाम) यापैकी कोणत्याही एका तळावर बदली केली जाईल. बदलीच्या ठिकाणात नंतर कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक शैक्षणिक अर्हताधारक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १० मे पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading