Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

Raigad loksabha : …. आणि सुनील तटकरे जुन्या आठवणीने गहिवरले

श्रीवर्धन  : रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचार दौऱ्यादारम्यान महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना जुन्या आठवणीने गहिवरून आल्याचे बघायला मिळाले. याचवेळी  निवडणूका येतात, जातात मात्र, आम्ही जनतेच्या कामासाठी २४ तास उपलब्ध आहोत, तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. त्यामुळेच माझ्या जीवात जीव असेपर्यंत जनतेचे काम करत राहणार आहे अशी ग्वाही सुनील तटकरे यांनी दिली.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने मेळावा घेण्यात आला. यावेळी सुनील तटकरे बोलत होते.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी, अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, डॉ. मुश्ताक मुकादम, नजीब असवारे आदींसह अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

श्रीवर्धन आणि परिसरात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी डोळ्याला डोळा लागला नाही. अनिकेत, अदिती आम्ही कसातरी मार्ग काढून पोचलो आणि जे नुकसानीचे दृश्य पाहिले ते बघून माझे अश्रू थांबत नव्हते… मी माझे वडील गेल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा रडलो. हा घडलेला प्रसंग सांगताना तटकरे यांना क्षणभर गहिवरून आले.

पुढे बोलताना तटकरे म्हणाले, समाजामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आजही माझा अल्पसंख्याक समाज माझ्यासोबत आहे. कारण या समाजासोबत माझे अनेक वर्षांचे ऋणानुबंध चांगले राहिले आहेत. १९८०-९० च्या दशकात कोकणाला  विकासात्मक न्याय मिळाला नव्हता. परंतु बॅरिस्टर अंतुले यांच्यामुळे खरा न्याय कोकणाला मिळाला. दूरदृष्टी ठेवून बॅरिस्टर अंतुले यांनी कोकणासाठी काम केले. त्यांच्यासारखा सेक्युलर नेता मी आजवर पाहिलेला नाही.

सेक्युलर विचार आम्ही कधी सोडले नाही आणि सोडणार नाही असे सांगतानाच आम्ही भाजपात गेलो अशी ओरड विरोधक करत आहे मात्र आम्ही भाजपच्या मंत्रीमंडळात गेलो आहोत. सत्तेतून जनतेचा विश्वास आणि विकास घेऊन काम करण्यासाठी गेल्याचे सांगून अशा अनेक वेगवेगळ्या आघाड्या देशाच्या राजकारणात तयार झाल्या आहेत, असे तटकरे यांनी सांगितले.

तसेच,  मी ऊर्जा मंत्री असताना जो काही कालावधी मिळाला त्या कालावधीत राज्याला भारनियमनमुक्त केले होते. मात्र अनंत गीते यांनी दोनवेळा मंत्री असताना एक तरी काम केलेले दाखवा. बॅरिस्टर अंतुले यांना मंत्रीपद मिळाले त्यावेळी त्यांनी ‘पल्स पोलिओ’ मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू करणारे पहिले मंत्री अंतुले होते, असेही  तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान,  १४० कोटी रुपयांचा निधी युनानी महाविद्यालयाला देण्यास मंजुरी मिळाली आहे. अल्पसंख्याक विभागाला निधी देण्याचे काम अजितदादा पवार यांनी केले आहे. हे सरकार आल्यावर अल्पसंख्याक समाजासाठी अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर करुन घेतला असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading